Thu, Apr 25, 2019 15:24होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भिवंडीत पोलीस ठाण्यावरून दंगल घडवणार्‍या मुख्य सूत्रधाराला अटक

भिवंडीत पोलीस ठाण्यावरून दंगल घडवणार्‍या मुख्य सूत्रधाराला अटक

Published On: Jul 16 2018 1:43AM | Last Updated: Jul 16 2018 1:33AMभिवंडी : वार्ताहर

भिवंडी शहरातील निजामपूर पोलीस ठाण्याच्या बांधकामास विरोध करून दंगल घडवणारा मुख्य सूत्रधार मोहम्मद युसूफ मो. इब्राहिम मोमीन ऊर्फ युसूफ रझा (30 रा. कोटरगेट) याला निजामपूर पोलिसांनी शनिवारी गजाआड केले. कोटरगेट येथील निजामपूरा पोलीस ठाण्याच्या इमारत बांधकामास 5 जुलै 2006 रोजी विरोध करून रझा अकॅडमी या संघटनेचा प्रमुख युसूफ रझा व सचिव शकील रझा या दोघांनी संगनमताने नागरिकांना भडकावून पोलिसांवर दगडफेक करून दंगल घडवली होती. 

या दंगलीत एसटी बसेस जाळून तत्कालीन पोलीस उपायुक्त आर. डी. शिंदे यांच्यासह 39 पोलीस कर्मचार्‍यांना जखमी केले होते. तसेच या दंगलीत जमावाकडून दोन पोलिसांचीही निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ माजली होती. या प्रकरणी युसूफ रझा याच्यासह 400 जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. मात्र दंगलीच्या या घटनेनंतर युसूफ हा फरार झाला होता. 

युसूफच्या अटकेसाठी भिवंडीचे पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी देशातील सर्व विमानतळ प्राधिकरणाला त्याची माहिती दिली होती. त्यानुसार युसूफ रझा हा सौदी अरेबिया येथून भारतात येत असून तो मुंबई विमानतळावर उतरणार असल्याची माहिती मिळाल्याने सहारा विमानतळ पोलिसांनी शनिवारी त्याला ताब्यात घेऊन निजामपूर पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.