Wed, Apr 24, 2019 01:54होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भिडे गुरुजींच्या अटकेसाठी ८ दिवस

भिडे गुरुजींच्या अटकेसाठी ८ दिवस

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक करावी अन्यथा आजच्यापेक्षा मोठे आंदोलन करून विधानभवनाला घेराव घालण्यात येईल, असा इशारा भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी आझाद मैदानात एल्गार मोेर्चामध्ये दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शिष्टमंडळासोबत केलेल्या चर्चेतही आंबेडकरांनी सरकारला अल्टिमेटम देत बजावले की, भिडे गुरुजींना आठ दिवसांत अटक न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र केले जाईल.

तीन महिने उलटल्यानंतरही सरकारला भिडेंविरोधात पुरावे मिळत नसल्याने त्यांनी खेद व्यक्‍त केला. भिडे मोदींचे गुरू असले तरी आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही. मोदींना सत्तेवरून घालवण्याचा निर्धार यावेळी आंबेडकर यांनी व्यक्‍त केला.

फेसबुकच्या माध्यमातून थेट मुख्यमंत्र्यांना मारण्याची धमकी देणार्‍या रावसाहेब पाटील यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी यावेळी आंबेडकर यांनी केली. पाटील यांचे भिडे यांच्याशी संबंध असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी आठ दिवसांत चौकशी करून, त्यामध्ये दोषी असलेल्यांविरोधात कारवाई करण्याचे आश्‍वासन दिल्याची माहिती आंबेडकर यांनी दिली. पाटील यांच्याविरोधात कारवाई करण्यास टाळाटाळ करणारे सरकार लोकशाही मार्गाने आंदोलन करताना आम्हाला  थेट नक्षलवादी ठरवतात व आमच्यामागे मात्र पोलिसी कारवाईचा ससेमिरा लावतात, अशी टीका त्यांनी केली.

भायखळा येथून आझाद मैदानात येणार्‍या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने मोर्चेकरी थेट आझाद मैदानात जमा झाले होते.  राज्याच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या भीमसैनिकांमुळे आझाद मैदानाचा पूर्ण परिसर निळ्या झेंड्यांनी भरला होता. आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व भिडेंना अटक केल्याशिवाय हा लढा संपुष्टात येणार नसल्याचे स्पष्ट केल्याचे आंबेडकर म्हणाले. मोर्चेकर्‍यांची गर्दी झाल्याने पोलिसांनी आझाद मैदानाच्या मुख्य भागात मोर्चा नेण्याचा निर्णय घेतला.

Tags :  Koregaon Bhima case, Sambhaji Bhide,  arrested, eight day, Prakash Ambedkar,

या मोर्चासाठी मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. या मोर्चाला उपस्थित राहण्यासाठी भारिप बहुजन महासंघाचे अनेक कार्यकर्ते ठाणे शहर अध्यक्ष राजाभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ठाण्याहून चालत घाटकोपर येथे आले. पोलिसांनी त्यांना तिथून पोलिस वाहनांद्वारे आझाद मैदानात आणले.


  •