होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महाशिवरात्री आज की उद्या? जाणून घ्या

महाशिवरात्री आज की उद्या? जाणून घ्या

Published On: Feb 13 2018 9:41AM | Last Updated: Feb 13 2018 9:41AMठाणे/मुरबाड :  पुढारी वृत्तसेवा

फाल्गुन महिन्यातील महाशिवरात्र हा उत्सव संपूर्ण देशात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. वर्षातील प्रत्येक महिन्यात एक शिवरात्र असते. परंतु यंदा तब्बल 47 वर्षानंतर 13 आणि 14 फेब्रुवारी आदी दोन दिवस महाशिवरात्र साजरी करण्याचा योग जुळून आल्याची एकच चर्चा समाजमाध्यमात सुरू आहे. तथापि महाशिवरात्र यंदाही एकच आहे आणि ती आजच म्हणजे मंगळवारी साजरी होत असल्याचा निर्वाळा पंचांग अभ्यासकांनी दिला.

वाचा : महाशिवरात्र : शिव आणि शक्‍तीच्या मिलनाचे महापर्व

महाशिवरात्र 13 व 14 फेब्रुवारी अशी दोन दिवस असल्याबद्दल भाविकांच्या मनात साशंकता आहे. निशिथकाळात म्हणजे रात्री 12ः28 ते उत्तररात्री 1ः18 या काळात माघ कृष्ण चतुर्दशी असल्याने आजच (13 फेब्रुवारी) महाशिवरात्री असल्याचे खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दै. पुढारीला सांगितले. ब्रह्माने सृष्टी निर्माण केली. विष्णू सृष्टीचे पालन करतो आणि भगवान शंकर सृष्टीतील वाईट गोष्टींचा लय करतो, अशी श्रद्धा आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने आपल्यातील वाईट गोष्टींचा लय व्हावा यासाठीच शिवपूजन करावयाचे असते, असेही त्यांनी सांगितले.

एकच चमचा दूध वाहा

महाशिवरात्रीनिमित्त भाविक भक्तिभावाने शंकराच्या पिंडीवर दूध किंवा दही वाहतात, अभिषेक करतात. मात्र ठाण्यातील पाचपाखाडी येथील ज्ञानराज शंकराच्या मंदिरात केवळ एकच चमचा दूध किंवा दही अर्पण केले जाते. उर्वरित दूध भाविकांना प्रसाद म्हणून वाटप केले जाते. या मंदिरात ही छान पद्धत सुरू झाली आहे. अन्य मंदिरांनीही या मंदिराचे अनुकरण करावे, असे आवाहनही सोमण यांनी केले. कारण पिंडीवर वाहिलेले दूधदह्याची नीट विल्हेवाट लागत नाही, ते वाया जाते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.