Wed, Jul 08, 2020 17:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शरद पवारांना समजून घ्यायला १०० जन्म लागतील : संजय राऊत

'पवारांना समजून घ्यायला १०० जन्म लागतील'

Last Updated: Nov 19 2019 1:27PM

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊतमुंबईः विशेष प्रतिनिधी

शरद पवार यांचा अनुभव मोठा आहे, ते पाहता भाजपवाल्यांना पवारांना समजून घ्यायला 100 जन्म घ्यावे लागतील, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. शरद पवार यांनी राज्यातील सरकार स्थापनेबाबत केलेले विधान काही चुकीचे नाही. राज्यातील क्रमांक 1 आणि 2 चे पक्ष म्हणून आम्हालाच सत्ता स्थापनेचा विचार करायला पाहिजे, तो विचार आम्ही करत आहोत, असे संजय राऊत यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन सांगितले. शिवसेनाच राज्यात सरकार स्थापन करेल आणि स्थिर सरकार देईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सत्ता स्थापनेबाबत शिवसेना आणि भाजपला विचारा, असे सोमवारी शरद पवार दिल्ली येथे म्हणाले होते. यावरून राऊत यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना शरद पवार हे काहीही चुकीचे बोलले नसल्याचा निर्वाळा राऊत यांनी दिला. काही दिवसांपूर्वी भाजपच्या मुंबईतल्या नेत्यांनी मला सांगितले होते, की नरेंद्र मोदी यांना समजून घ्यायला मला 25 जन्म लागतील. यावर पलटवार म्हणून राऊत यांनी भाजपवाल्यांना शरद पवारांना समजून घ्यायला 100 जन्म लागतील, असे म्हटले आहे.

राज्यात लवकरच स्थिर सरकार स्थापन होईल आणि तेही शिवसेनेच्याच नेतृत्वात होईल, असा विश्वास राऊत यांनी यावेळी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात शरद पवार माझे गुरू. मात्र पवारांची खरी लढाई ही भाजपशी आहे. तरीही पंतप्रधानांच्या वक्तव्यांवरून भाजपाने काहीतरी शिकावे असा सल्लाही राऊत यांनी यावेळी दिला.

संजय राऊत म्हणाले, सरकार स्थापन करायला अनेकदा जास्त दिवस लागले आहेत. भाजपचे सरकार असलेल्या काही राज्यांमध्ये तर चार-चार, पाच-पाच महिने वेळ लागला आहे. हा जो काही गोंधळ आहे तो माध्यमांच्या मनात असू शकेन. ज्यांनी गोंधळ निर्माण करायचा आहे हे ठरवलेच आहे, राज्यात स्थिर सरकार येऊ नये असे ज्याने ठरवले आहे त्यांना हा पेच किंवा गोंधळ वाटत असेन. त्यामुळेच ते तशाप्रकारच्या बातम्या पसरवत असतील. शिवसेनेच्या मनात कोणताही गोंधळ नाही, असा टोलाही राऊत यानी लगावला.

रामदास आठवलेंनी भाजपला 3 वर्ष आणि शिवसेनेला 2 वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याचा फॉर्म्युला सांगितला. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी रामदास आठवलेचे हेच ऐकायचे बाकी होते असे म्हणत त्यांना कोपरखळी लगावली. रामदास आठवले केंद्रात राज्यमंत्री आहेत. त्यांनी केंद्रातील आपले अधिकार वाढवण्यासाठी प्रयत्न करावे. शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासाठी कुणाच्या मध्यस्थीची गरज नाही, असेही राऊत यावेळी म्हणाले.

महाराष्ट्रात भाजपला उभे करण्याचे, जागा देण्याचे काम शिवसेनेने आणि शिवसेना प्रमुखांनी केले. 2014 ला आम्ही युती तोडली होती, युतीत आम्हाला जायचे नव्हते. त्यावेळी अमित शाह स्वतः आले. त्यावेळी आम्ही त्यांच्यासोबत गेलो नसतो, तर निकाल वेगळा असता, असे राऊत म्हणाले.