उद्धव ठाकरे घेणार सोनिया गांधींची भेट? 

Last Updated: Nov 15 2019 9:50AM
Responsive image


मुंबई : पुढारी ऑनलाईन

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरू आहेत. सत्ता स्थापनेचा तिढा जवळजवळ संपुष्टात येत असल्याची चिन्हे असून १७ तारखेला नव्या सरकारच्या स्थापनेवर शिक्‍कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. राज्यात सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाल्यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिल्लीत जाऊन सोनिया गांधी यांची सदिच्छा भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शरद पवार हे दिल्लीत १७ तारखेला सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. याचबरोबर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे देखील दिल्लीत जाऊन सोनिया गांधी यांची भेट घेणार असल्याची शक्यता आहे.

येत्या सोमवारपासून दिल्लीत संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरुवात होत आहे. त्याआधी शरद पवार सोनिया गांधींची भेट घेणार असल्याचे समजते. शरद पवार आणि सोनिया यांच्या बैठकीला राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने किमान समान कार्यक्रमाचा मसुदा तयार केला असून त्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल, तर उपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीला दिले जाणार आहे. काँग्रेस मात्र सरकारला बाहेरून पाठिंबा देणार आहे.
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या किमान समान कार्यक्रमाच्या मसुद्यावर काँग्रेसच्या अंतरीम अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीत अंतिम निर्णय होणार आहे.