Thu, Jul 18, 2019 04:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पहिल्याच पावसाने 'तुंबई'; मान्‍सून दाखल

पहिल्याच पावसाने 'तुंबई'; मान्‍सून दाखल

Published On: Jun 09 2018 2:04PM | Last Updated: Jun 09 2018 2:04PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

महाराष्‍ट्रात मान्‍सून दाखल झाला असून आज, शनिवारी पहाटेपासूनच पावसाने मुंबईसह ठाणे, कोकणात जोरदार हजेरी लावली. मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाने धुमाकूळ घातला. सकाळी झालेल्या मोसमातील पहिल्याच मुसळधार पावसाने मुंबईची काही भागात 'तुंबई' झाली. 

पावासामुळे दक्षिण मुंबईतील हिंदमाता, किंग्‍ज सर्कल, चुनाभट्टी आणि सायन परिसरात रस्‍त्यावर पाणी तुंबले. तसेच मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली आहे. पावसामुळे मुंबईतील लोकल वाहतूकही उशिरा सुरू आहे. तर माटुंगा ते कुर्ला दरम्यानचा रूळ पाण्याखाली गेल्याने लोकलचा खोळंबा झाला आहे. मध्य रेल्‍वेची वाहतूक ४० मिनिटे तर पश्चिम रेल्‍वे व हार्बर रेल्‍वेची वाहतूक १५ ते २० मिनिटांनी उशिरा सुरू आहे. त्यामुळे चाकरमान्यांचे हाल होत आहेत. 

ठाणे जिल्‍ह्यात कल्याण, मुरबाड, उल्‍हासनगर, शहापूर परिसरातही पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे येथीलही रेल्‍वे उशिरानं धावत आहे. मान्‍सूनच्या पावसाने रायगड, रत्‍नागिरी आणि सिंधुदुर्गलाही झोडपून काढले. तसेच मराठवाडा आणि पश्चिम महाराष्‍ट्रातही पाऊस दमदार बरसला. राज्यात काही ठिकाणी पावसामुळे जनजीवन विस्‍कळीत झाले आहे. हवामान खात्याने ८ ते १२ जूनपर्यंत मुंबई आणि उपनगरांमध्ये अतिवृष्‍टीची शक्यता वर्तवली आहे.