Thu, May 23, 2019 20:30
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पोलिसांसाठीची बुलेट प्रूफ जॅकेट्स चाचणीत अपयशी!

पोलिसांसाठीची बुलेट प्रूफ जॅकेट्स चाचणीत अपयशी!

Published On: Feb 04 2018 5:52PM | Last Updated: Feb 04 2018 5:52PMनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

महाराष्ट्र पोलिस दलाला मिळालेल्या 4 हजार 600  बुलेट प्रूफ जॅकेट्स पैकी १ हजार ४३० जॅकेट्स परत करण्यात आली आहेत. ही जॅकेट्स ‘एके-४७’च्या चाचणीमध्ये अयशस्वी ठरल्याने निर्मीती करणाऱ्या कंपनीला परत पाठवली आहेत

मुंबईत झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्यानंतर राज्य पोलिसांना मिळालेल्या ४ हजार ६०० बुलेट प्रूफ जॅकेटमधील  १ हजार ४३० जॅकेट्स परत करण्यात आली आहे. ‘एके-४७ गोळी चाचणीत अयशस्वी ठरलेली ही बुलेट प्रूफ जॅकेट्स उत्पादक कंपनीला परत पाठवण्यात आली आहेत, असे अतिरीक्त पोलिस महासंचालक (खरेदी आणि समन्वयक) व्ही.व्ही लक्ष्मीनारायण यांनी सांगितले. 

ही जॅकेट्स कानपूरमधील उत्पादक कंपनीला परत पाठवण्यात आली आहेत. पोलिस विभागाकडून कंपनीला ५ हजार जॅकेट्स बनवण्याची ऑर्डर देण्यात आली होती. संबंधित कंपनी अनेक सुरक्षा दलांना, असे जॅकेट्स बनवून देते. या ५ हजार जॅकेट्ससाठी पोलिस विभागाने संबंधित कंपनीला १७ कोटी रूपये दिले होते. 

चंदीगडमधील केंद्रीय फॉरेंसिक लॅबमध्ये सर्वच जॅकेट्सची चाचणी घेण्यात आली. या चाचणीमध्ये फक्त ३ हजार जॅकेट्सच यशस्वी ठरल्या. या जॅकेट्सवर ‘एके-४७’ गोळ्या झाडण्यात आल्या. ४ हजार ६०० पैकी १ हजार ४३० जॅकेट्समधून या गोळ्या आरपार गेल्या. याबाबत उत्पादक कंपनीला कळवण्यात आले आहे. या जॅकेट्सच्या बदली दुसरे नवे जॅकेट्स मागवण्यात आले आहेत. तसेच नवीन जॅकेट्सचीही चाचणी घेण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

२००८ मधील दहशतवादी हल्ल्यामध्ये एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांना विरमरण आले होते. त्यांच्या मृत्यूनंतरच मुंबई पोलिसांमध्ये बुलेट प्रूफ जॅकेट्सच्या गुणवत्तेवरून वाद सुरू झाला. अखेर मुंबई हल्ल्याच्या 9 वर्षांनंतर पोलिसांना जॅकेट्स मिळण्यास सुरुवात झाली.