Fri, Mar 22, 2019 23:52होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महात्मा फुलेंना भारतरत्न देण्यासाठी राज्‍याची शिफारस 

महात्मा फुलेंना भारतरत्न देण्यासाठी राज्‍याची शिफारस 

Published On: Aug 07 2018 5:13PM | Last Updated: Aug 07 2018 5:22PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

स्त्री शिक्षणाचे प्रणेते, शेतकऱ्यांचे कैवारी, क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची शिफारस राज्‍य सरकारने केंद्र सरकारकडे केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली आहे. 

वरळी येथे आयोजित केलेल्‍या ओबीसी महासंघाच्या महाअधिवेशनात मुख्यमंत्री बोलत होते. ते म्‍हणाले, ‘‘महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी शिफारस केंद्राला केली आहे. त्‍याबरोबरच येत्या दोन अर्थसंकल्पात ओबीसी महामंडळासाठी ५०० कोटींच्या निधीची तरतूद केली जाईल. ओबीसींच्या हिताच्या योजना राबवताना भाजप सरकार हात आखडता घेणार नाही. त्यांच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजना राबवू.’’ 

दरम्यान, महात्मा फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी प्रयत्‍न करत असल्‍याचे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी २२ नोव्हेंबर २०१५ रोजी केले होते. त्‍यानंतर २०१६ मध्ये राज्यसरकार महात्मा फुले यांना भारतरत्‍न पुरस्‍कार देण्यासाठी केंद्राकडे शिफारस करेल अशी घोषणा फडणवीस यांनी विधानसभेत केली होती. राष्‍ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही मार्च २०१८ मध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्‍न पुरस्‍कार करण्याची मागणी केली होती. तसेच बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी देखील जानेवारी २०१५ मध्ये महात्मा जोतिबा फुले आणि काशीराम यांना भारतरत्न किताब देण्याची मागणी केली होती.