Fri, Jul 19, 2019 07:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अनाथ मुलांसाठी स्‍पर्धा परीक्षेत राखीव जागा : CM

अनाथ मुलांसाठी स्‍पर्धा परीक्षेत राखीव जागा : CM

Published On: Jan 11 2018 11:32AM | Last Updated: Jan 11 2018 11:42AM

बुकमार्क करा
 

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील स्‍पर्धा परीक्षा देऊन प्रशासकीय सेवेत जाऊ इच्‍छिणार्‍या अनाथ मुलांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुषखबर दिली आहे. राज्य सरकारच्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या अनाथ विद्यार्थ्यांना जाती- जमातींसाठी राखीव असलेल्या प्रवर्गासाठीच्या आरक्षणाचा लाभ होत नाही. ही बाब लक्षात घेता अनाथ विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये राखीव जागांचा वेगळा प्रवर्ग ठेवण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

मुंबईत मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने उत्‍कृष्‍ट पत्रकार पुरस्‍कारांचे वितरण बुधवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्‍ते आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्‍थितीत करण्यात आले. यावेळी बोलाताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी एका अनाथ मुलीच्या भेटीचा प्रसंग सांगितला. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्पर्धा परीक्षा देणाऱ्या एक विद्यार्थिनीनं नुकतीच भेट घेऊन याबाबतची आपली समस्या मांडली होती. तिला चांगले गुण असले तरी खुल्या गटातून निवडीसाठी पात्र होण्याइतके गुण नव्हते. मात्र तिचा आरक्षित प्रवर्गातून विचार झाला असता तर तिला नक्कीच संधी मिळाली असती. यासंदर्भात लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांशी आपली चर्चा झाली, पण नियमात तशी तरतूद नसल्याने त्या अनाथ विद्यार्थिनींची संधी हुकली. ही समस्या विचारत घेऊन लवकरच अनाथांसाठी वेगळा प्रवर्ग शासनाच्या स्पर्धा परीक्षांत करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कुटुंबाचा आधार नसलेला आणि कायमच संघर्ष पाचवीला पूजलेला अशा स्थितीत असणारी अनाथ मुलंही एमपीएससीच्या परीक्षेसाठी दिवस-रात्र एक करत असतात. त्यामुळे अनाथ मुलांसाठी विशेष प्रवर्ग तयार झाल्यास, त्यांच्या या संघर्षाला काहीसा आधार मिळेल. ज्या विद्यार्थिनीची संधी हुकली तिने, पुढील वर्षी चांगला अभ्यास करून अधिक चांगल्या गुणांनी आपण उत्तीर्ण होऊ, असे सांगितले. तसेच अनाथांसाठी वेगळा प्रवर्ग सुरू करण्यात येणार असल्याबद्दल समाधान व्यक्त केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.