होमपेज › Mumbai-Thane-Raigad › उत्तर मुंबईत भाजपाला मराठीचा विसर

उत्तर मुंबईत भाजपाला मराठीचा विसर

Published On: Feb 08 2018 11:18AM | Last Updated: Feb 08 2018 11:18AMमुंबई: प्रकाश साबळे
निवडणुकीत मराठीचा मुद्दा पुढे करणार्‍या भारतीय जनता पार्टीला सत्तेत आल्यावर मराठीचा विसर पडू लागल्याचे चित्र उत्तर मुंबई मतदारसंघामध्ये पाहण्यास मिळत आहे.रविवारी पं.दीनदयाळ उपाध्याय यांच्या 50 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिराच्या होर्डिंगवरुन मराठी भाषाच गायब झाली आहे. त्यामुळे मराठी भाषिकांमध्ये नाराजी पसरल्याची माहिती एका भाजपा पदाधिकार्‍याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. भाजपा उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष विनोद शेलार यांच्या नेतृत्वाखाली आरके.एचआरव्ही एड्स रिसर्च केअर सेंटरतर्फे संयुक्तपणे मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन मालाड येथे करण्यात आले आहे.

या शिबिराचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते होणार आहे. यासाठी उत्तर मुंबई मतदार संघातील दहिसर, बोरिवली, कांदिवली आणि मालाड आदी झोपडपट्टया, रस्ते, गल्ल्या, शाळा, महाविद्यालय, रूग्णालय, वीजेचे खांब, नाका तसेच मिळेल त्याठिकाणी अनधिकृतपणे लहान, मोठी होर्डिंग लावली आहेत. विशेष म्हणजे यात मराठीच्या एकाहीहोर्डिंगचा समावेश नाही. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्याचे स्वप्न दाखवणार्‍या भाजपा सरकारवर यामुळे शंका उपस्थित केल्या जात आहेत. उत्तर मुंबईचे भाजपा जिल्हाध्यक्ष विनोद शेलार हे स्वत: मराठी असूनसुध्दा त्यांच्याकडून अशाप्रकारे चूक झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. याविषयी उत्तर मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष विनोद शेलार यांच्याशी संपर्क साधण्याच्या प्रयत्न केला असता तो होवू शकला नाही.  

या हा आरोग्य शिबिरात 1 लाखांपेक्षा अधिक रूग्णांची मेडिकल तपासणी आणि निःशुल्क औषधे वाटप केले जाणार आहेत. तर 2000 डॉक्टर आणि 2000 पॅरामेडिकल कर्मचार्‍यांचा सहभाग असेल. तपासणीनुसार विख्यात रूग्णालयात निशुल्क शास्रक्रियेची सोय केली जाईल. याबरोबरच 20 हजार चष्म्याचे निशुल्क वितरण केले जाणार आहे. या सर्वांचा खरोखरच रूग्णांना लाभ मिळेल का? हे येत्या रविवारीच कळेल. काही ठिकाणी मराठीत होर्डिंग लावली आहेत. तसेच पत्रकेही मराठीत छापली आहेत, असे उत्तर मुंबई भाजपचे जिल्हाध्यक्ष विनोद शेलार यांनी सांगीतले