Mon, Aug 26, 2019 15:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विधानसभेच्या जागावाटपात काँग्रेस- राष्ट्रवादीचा ५०-५० फॉर्म्युला

विधानसभेच्या जागावाटपात काँग्रेस- राष्ट्रवादीचा ५०-५० फॉर्म्युला

Published On: Jul 17 2019 11:39AM | Last Updated: Jul 17 2019 11:17AM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय वर्तुळात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. एकीकडे राजीनामानाट्य तर दुसरीकडे आगामी विधानसभा निवडणुकीची मोट बांधणी सुरू आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेत्यांची बैठक मुंबइ इथे पार पडली. 

विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाच्या चर्चेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत जागावाटपासंबंधी राष्ट्रवादीकडून नवा फॉर्म्युला मांडण्यात आला आहे. आगामी निवडणुकीत दोन्ही पक्षांनी ५०-५० चा फॉर्म्युला वापर समसमान जागा लढवाव्यात, असा प्रस्ताव राष्ट्रवादीने बैठकीत मांडला आहे. 

महाराष्ट्रात आघाडी करताना जागावाटपात याआधी राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेस नेहमीच वरचढ राहिली आहे. पण आता चित्र बदलले असल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे. कारण मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तसेच आता झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची कामगिरी काँग्रेसच्या तुलनेत उजवी ठरली आहे. याचाच दाखला देत आता राष्ट्रवादीने ५०-५० चा फॉर्म्युला मांडला आहे.

दुसरीकडे, काँग्रेसने मात्र जागावाटबाबत नवा प्रस्ताव राष्ट्रवादीसमोर ठेवला आहे. मागील निवडणुकीत जिंकलेल्या जागा त्या-त्या पक्षाकडे राहतील. तसेच ज्या जागांवर जो पक्ष दुसऱ्या नंबरवर होता ती जागा त्या पक्षाकडे जाईल, असा काँग्रेसचा प्रस्ताव आहे. काँग्रेसच्या या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेसच्या वाट्याला १०६ आणि राष्ट्रवादीकडे 95 जागा जातील. तर उरलेल्या ८७ जागांच्या वाटपावर मित्रपक्षांसह चर्चा होऊ शकते.