Tue, May 21, 2019 00:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिवसैनिक नेहमीच इतिहास घडवितो : आदित्य ठाकरे (Video)

शिवसैनिक नेहमीच इतिहास घडवितो : आदित्य ठाकरे (Video)

Published On: Jun 09 2018 4:39PM | Last Updated: Jun 09 2018 4:39PMमहाड : श्रीकृष्ण द.बाळ.  

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे राज्यातील स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचे स्‍वप्न विधान परिषदेतील विजयाने सिद्ध करण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे, असे आवाहन युवा सेनेचे अध्यक्ष शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आज महाड येथे केले. कोकण पदवीधर मतदारसंघातील  शिवसेनेचे  उमेदवार संजय मोरे यांच्या प्रचारार्थ झालेल्या मार्गदर्शनपर सभेमध्ये ठाकरे यांनी हे आवाहन केले. 

कोकण पदवीधर मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार संजय मोरे यांच्या प्रचारात प्रित्यर्थ आज महाड मधील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकांमध्ये  एका विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपस्थित शिवसैनिक लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांसह  पदवीधर संघातील मतदारांना आदित्य ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नामदार अनंत गीते, शिवसेनेचे खासदार सचिव अनिल देसाई, महाडचे आमदार भरतशेठ गोगावले, आमदार राहुल पाटील ,युवा सेनेचे दक्षिण रायगड जिल्हा अधिकारी  विकास गोगावले, दक्षिण रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख सैो करजे, महाड उपजिल्हा महिला आघाडी प्रमुख अॅड.श्रीमती मोहिते  संपर्क प्रमुख श्री सदानंद थरवळ उपजिल्हाप्रमुख श्री बीपीन महामुणकर तालुका प्रमुख श्री सुरेश महाडिक  महाड पोलादपूर माणगाव येथील सर्व लोकप्रतिनिधी सभापती पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य महाडशहरप्रमुख  दिपक सावत तसेच नगरसेवक आदि मान्यवर उपस्थित होते. 

आपल्या सुमारे वीस मिनिटांच्या अभ्यासपूर्ण मनोगतामध्ये मार्गदर्शन करताना आदित्य ठाकरे यांनी विधान परिषदेची ही निवडणूक महत्त्वपूर्ण का आहे, याबाबत स्पष्टीकरण देताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वताकदीवर राज्यात सत्ता आणण्याच्या प्रयत्नांचा हा एक भाग असल्याचे सांगितले . 

या निवडणुकीबरोबर राज्यात एकूण चार निवडणुका विधान परिषदेच्या होत असून, या सर्व ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार विजयी होतील असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. विधान परिषदेसाठीची ही निवडणूक तांत्रिक पद्धतीने जास्त असल्याने या ठिकाणी असलेले मतदार हे विधानसभा व लोकसभा मतदार संघांपेक्षा वेगळे असल्याने त्यांची झालेली नोंदणी ही शिवसेनेच्या फायद्याची असल्याचे मत व्यक्त केले. 

मुंबई विद्यापीठाच्या सेनेच्या निवडणुकीमध्ये या निवडणुकीबाबत चौकांमध्ये असणारे कुतूहल आपल्याला अभ्यासायला मिळाले, असे सांगताना त्यांनी विधान परिषदेची निवडणूक ही अत्यंत महत्त्वपूर्ण असून, या निवडणूकीमधील नोंदणी झालेल्या मतदारांपैकी एकूण निम्म्यापेक्षा जास्त मतदार हे शिवसेनेचे असल्याने आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास त्‍यांनी व्यक्‍त केला.


कोकण पदवीधर मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार संजय मोरे हाडामासाचे सैनिक असून ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये यांच्या महापौर पदाच्या काळातच आलेल्या सर्व आव्हानाना अंगावर घेऊन मित्र व शत्रू पक्षाच्या विरोधात शिवसेनेने पुन्हा एकदा ठाण्यामध्ये एक हाती सत्ता मिळवली होती याची आठवण देऊन शिवसैनिक हा सदैव इतिहास घडवतो असे सांगून कोकण पदवीधर मतदार संघातील विजयासाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे असे आवाहन केले . 

या निवडणुकीतील शिवसेनेचा विजय निश्चित असताना प्रत्येक शिवसैनिकाने वीस मतदारांची यादी समोर ठेऊन प्रत्येकाशी संपर्क साधावा अशी सूचना  त्यानी केली. मुंबई सिनेटची निवडणूक जिंकली म्हणजे कामे संपली नसून आता प्रत्येक मतदाराशी संपर्क साधण्याची आवश्यकता असल्याचे त्‍यांनी स्पष्ट केले. यावेळी त्‍यांनी विरोधी पक्षातील उमेदवार या पक्षातून त्या पक्षात  गेले असल्याने त्यांना प्रत्यक्ष मतदारसंघ व उमेदवारांची माहिती नसल्याने याचा फायदा आपल्‍या उमेदवारांना होइल असे ते म्‍हणाले.

या निवडणुकीसाठीही आपण मतदारांना आवाहन करणारा वचननामा देणार असून, शिवसेनेने आजवर कधीही जाहीरनाम्यावर विश्वास ठेवलेल्या नसल्याचे त्यांनी मत व्यक्त केले . 
 तत्पूर्वी कोकण पदविधर मतदारसंघातील उमेदवार  संजय मोरे यांनी आपल्या मनोगतामध्ये शिवसेनेने माझ्यासारख्या सामान्य उमेदवाराला ही संधी देऊन  सामान्य शिवसैनिकांचे सोने केल्याचे मत व्यक्त केले. आजकाल होणाऱ्या निवडणुका या सोशल मीडिया व अन्य इलेक्ट्रॉनिक माध्यमांमधून जास्त पद्धतीने प्रचार करून होत असल्‍या तरीही आपली सर्व मदार शिवसेना युवा सैनिक व महिला आघाडीच्या सैनिकांवर अवलंबून असल्याने आपला विजय निश्चित असल्याची ग्वाही दिली. शिवसेनेने माझ्यासारख्या सर्वसामान्य शिवसैनिकाला दिलेली उमेदवारी ही इतिहास घडविणारी असल्याने कोकणातील सर्व मतदारांनी केवळ निवडणुकीमध्ये जबाबदारी म्हणून नव्हे तर कर्तव्यपूर्तीच्या भावनेतून काम करावे असे आवाहन केले. 

या प्रसंगी शिवसेना नेते युवा अध्यक्ष युवा सेनेचे अध्यक्ष श्री आदित्य  ठाकरे,ना. अनंत गीते, खा. अनिल देसाई यांचा आमदार भरतशेठ गोगावले युवा सेना दक्षिण रायगड जिल्हा  अधिकारी  विकास गोगावले यांच्या हस्ते सन्मान  मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये  करण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून शालांत परीक्षेमध्ये प्रथम तीन क्रमांकावर महाड तालुक्यातून उत्तीर्ण झालेल्या तसेच विशेष प्रावीण्य मिळवलेल्या दोन विद्यार्थ्यांचा ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

या विशेष कार्यक्रमाला येण्यापूर्वी युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री ना.अनंत गीते, आ. भरतशेठ गोगावले, संपर्कप्रमुख सदानंद थरवळ, अॅड. राजू साबळे यांच्या समवेत छत्रपती शिवाजी चौकातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तसेच राष्ट्रीय स्मारकातील भारतरत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला  पुष्प वाहून अभिवादन केले .

कार्यक्रमाच्या सुरुवातीला दक्षिण रायगड जिल्हा उपप्रमुख  बिपीन महामुणकर माजी राजिप विरोधी पक्षनेते सुरेश कालगुडे तालुकाप्रमुख सुरेश महाडिक महाड पालिकेचे माजी उपाध्यक्ष नितीन पावले यांसह महिला आघाडी तसेच विविध मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  सुधीर शेट यांनी केले