Sun, May 26, 2019 13:26



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महडमध्ये २५० जणांना विषबाधा, ३मुले दगावली(video)

महडमध्ये २५० जणांना विषबाधा, ३मुले दगावली(video)

Published On: Jun 19 2018 7:31AM | Last Updated: Jun 19 2018 12:11PM



पनवेल : विक्रम बाबर 

महड येथील सुभाष माने यांच्या घराची वास्तुकशांतीच्या कार्यक्रमावेळी जेवणातून २५० गावकऱ्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार घडला आहे. यावेळी गंभीर असलेल्यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

खालापूर तालुक्यातील महड येथे अष्टविनायक पैकी वरद विनायकाचे स्थान आहे. सोमवारी रात्री उशीरा सुभाष माने यांनी बांधलेल्या नवीन घराच्या वास्तुशांती कार्यक्रमा होता. यावेळी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. जवळपास पाचशे लोकांचे जेवण बनवण्यात आले होते. यावेळी पहिल्या पंगतीमध्ये जेवण केलेल्या लहान मुलांना पोटात मळमळणे, चक्कर येणे, पोटात दुखणे असा त्रास सुरू झाला. असाच त्रास अनेकजणांना सुरू झाल्यानंतर हा प्रकार विषबाधा झाल्याचे लक्षात आले. त्रास होत असलेल्या लोकांना खोपोली येथील पार्वती रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र रुग्णांची संख्या जास्‍त असल्याने काही रुग्णांना पनवेल आणि नवी मुंबई परिसरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या पैकी खोपोलीतील पार्वती रुग्णालयात जवळपास ४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात १७ जणांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी तीन जण दगावले आहेत. यात दोन चिमुरड्यांचा समावेश आहे तर पनवेलमधील प्राचीन रुग्णालयात सात रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गांधी हॉस्पिटलमध्ये पाच रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी दोन रुग्णांची तब्येत गंभीर असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले आहे. खांदा कॉलनीमधील शेलार हॉस्पिटलमध्ये दोन रुग्णांवर उपचार सुरू आहे. यामधील एक रुग्ण अष्टविनायक हॉस्पिटलमध्ये दाखल झाला आहे. नवी मुंबईमधील नेरुळ परिसरातील डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये जवळपास पंधराहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

घातपाताची शक्यता ?

अन्नात  ( क्वरेट ) पावडर टाकल्याची शक्यता विविध रुग्णालयातील डॉक्टर आणि पोलीस विभागाकडून वर्तवली जात आहे. ही पावडर झाडावरील कीड मारण्यासाठी वापरली जाते.