Thu, Apr 25, 2019 11:30होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महाडमधील जमीन भूसंपादनास ग्रामस्थांचा विरोध  

महाडमधील जमीन भूसंपादनास ग्रामस्थांचा विरोध  

Published On: May 23 2018 2:47PM | Last Updated: May 23 2018 2:47PMमहाड  : प्रतिनिधी  

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत महाड तालुक्यातील मौजे धामणे जिते सवाणे ग्रामपंचायत हद्दीमधील जमीन भूसंपादन करण्यासंदर्भात मंडळाच्या १९६१चे कलम ३२( २) नुसार दाखल केलेल्या अधिसूचनेला स्थानिक ग्रामस्थांनी हरकत घेतली आहे.  कोणत्याही परिस्थितीमध्ये भूसंपादन करू दिले जाणार नाही, असा पवित्रा ग्रामस्‍थांनी घेतला आहे. शासनाने जबरदस्तीने जमीन संपादन करण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही आज(दि. २३ मे) दिलेल्या लेखी पत्रामध्ये धामणे जिते ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत महाड औद्योगिक वसाहतीमधील मौजे धामणे जिते सवाणे या ग्रामपंचायत हद्दीमधील ३२५ हेक्टर म्हणजेच  ८१२ एकर जमिनीचे भूसंपादन करण्याबाबत मंडळाच्या नियमानुसार अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या भूसंपादन संदर्भात प्रांताधिकारी कार्यालयामार्फत संबंधित तीनही ग्रामपंचायतींना लेखी पत्रानुसार याबाबतची माहिती देण्यात आली आहे. यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी  आपली हरकत आज प्रत्यक्ष प्रांताधिकाऱयांना लेखी निवेदनाद्वारे सादर केली. 

बुधवारी दुपारी धामणे गावच्या सरपंचांच्या आणि स्थानिक ग्रामस्थांच्या सहीचे निवेदन महाडचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार  यांना देण्यात आले. यामध्ये ग्रामपंचायत धामणेच्या वतीने दिनांक १० सप्टेंबर २०१७ च्या मासिक सभा तसेच ११ ऑक्टोबर २०१७च्या ग्रामसभेसह स्थानिक ग्रामस्थांसह ४ ऑक्टोबरच्या लेखी अर्जानुसार या भूसंपादन प्रक्रियेत नागरिकांचा तीव्र विरोध असल्याचे व जमीन भूसंपादनास हरकत असल्याचे नमूद करण्यात आले होते, हे स्पष्ट करण्यात आले आहे. अशाच आशयाचे लेखी निवेदन ग्रामपंचायत जिते तर्फे स्थानिक ग्रामस्थांसह सरपंचांच्या  स्वाक्षरी नुसार प्रांताधिकारी ईनामदार याना देण्यात आले.

या संबंधात एमआयडीसीचे विभागीय अधिकारी सह प्रांताधिकारी कार्यालयात भूसंपादन संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये ग्रामस्थांचा भूसंपादनास विरोध असल्यास ती संपादित केली जाणार नाही, असे शासनामार्फत जाहीर करून सुद्धा त्‍यांनी वारंवार नोटिसा दिल्याचे नमूद करण्यात आले. स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये भूमीसंपादनासंदर्भात दिलेल्या नोटिशीनंतर आता ग्रामस्थांनी आक्रमक रुप धारण केल्याचे आज स्पष्ट झाले आहे.   

या संदर्भात महाडचे प्रांताधिकारी विठ्ठल  इनामदार यांना विचारणा केली असता ते म्‍हणाले, ‘‘ग्रामस्थांनी घेतलेल्या हरकतीबाबत आपण औद्योगिक विकास महामंडळाला याची माहिती दिल्‍या नंतरच पुढील कोणतीही कार्यवाही करायची हे निश्चित करण्यात येईल. जमीन भूसंपादित करण्याच्या कामी या दिलेल्या नोटिसाही पहिली फेरी असून, यापुढील कार्यवाही त्यानंतरच संबंधित आलेल्या हरकतींवर निर्णय झाल्यानंतर घेतली जाईल.’’

 

Tags : mahad, Villager, Land Acquisition