होमपेज › Mumbai-Thane-Raigad › माथाडी बंद, मुंबई एपीएमसीत फक्‍त १२ गाड्या

माथाडी बंद, मुंबई एपीएमसीत फक्‍त १२ गाड्या

Published On: Jan 30 2018 10:39AM | Last Updated: Jan 30 2018 10:43AMनवी मुंबई : राजेंद्र पाटील 

राज्य सरकारने माथाडी बोर्डसह इतर महत्त्वाच्या ३८ बोर्डाचे  एकत्रीकरण करून एकच बोर्ड तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या विरोधात माथाडी कामगारांसह सर्व कामगार संघटनांनी मंगळवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या बंदचा मुंबई एपीएमसी घाऊक भाजीपाला बाजाराला फटका बसला आहे. दररोज होणारी ७५० ते ८०० भाजीपाला गाड्यांची आवक सोमवारी रात्री दहा ते मंगळवारी पहाटे सहा वाजेपर्यंत केवळ १२ गाड्यांची झाली आहे. आवक झालेल्यांपैकी एकही गाडी मुंबईसह उपनगरात सोडण्यात आली नाही. हा शेतमाल तसाच बाजार आवारात पडून आहे. किरकोळ व्यापारी भाजीपाला बाजारात फिरकले नसल्याने माल खरेदी विक्री होऊ शकला नाही.

दुपारनंतर मसाला, दाणा आणि कांदा बटाटा घाऊक बाजारात बंदचे पडसाद उमटण्याची दाट शक्यता आहे. मालाची चढ उतार करण्यासाठी माथाडी कामगार व तोलाई, वारणार कामगार बंदमध्ये सामील झाल्याने तीन घाऊक बाजारातील माल तसाच पडून राहणार आहे. 

सकाळ पासून माथाडी कामगार संघटनेचे पदधिकारी मुंबई एपीएमसीत फेरफटका मारून शंभर टक्के बंदला प्रतिसाद मिळेपर्यंत मार्केट बंद ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.
घाऊक व्यापारी, वाहनचालकांनीही पाठिंबा दिल्याने मुंबई एपीएमसीत शुकशुकाट होता. शिवाय महाराष्ट्र बंद असल्याची माहिती 295 बाजार समिती आवारात त्या त्या कामगार संघटनानी लावल्याने शेतकऱ्यांनी माल बाजारात आणला नाही. रेल्वे माल धक्क्यांवर कुठलीही मालाची चढ उतार केली जाणार नसल्याने रेल्वेचे रॅक लाईनवर उभे करून ठेवण्यात आले आहेत. सुरक्षा रक्षक मंडळातील कामगारही सहभागी झाल्याने अनेक ठिकाणी बोर्डची असलेली सुरक्षायंत्रणेचा बोजवारा उडाला आहे.