Sun, May 31, 2020 00:34होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गृहकर्जावर १५ वर्षांतील नीचांकी व्याजदर

गृहकर्जावर १५ वर्षांतील नीचांकी व्याजदर

Last Updated: May 24 2020 1:26AM
मुंबई : पुढारी डेस्क

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) व्याजदरात 40 बेसिस पॉईंट (100 बेसिस पॉईंट म्हणजे एक टक्के) ची कपात करण्याची घोषणा केल्याने गृहकर्जाचे दर 7 टक्क्यांवर येणार आहेत. हे दर 15 वर्षातील सर्वात कमी असून यामुळे सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न साकार होणे अधिक सुलभ होणार आहे. ईएमआयचे दरही कमी होणार असल्याने गृहकर्जदारांसाठी हे शुभवर्तमान आहे.

कोरोनाच्या संसर्गामुळे ठप्प झालेल्या व्यवसायात अनेकांची आर्थिक स्थिती अस्थिर झाली आहे. अशांना तीन महिने अधिकचा मोरेटोरियम (हप्त्याला स्थगिती) मिळणार आहे. म्हणजेच आणखी तीन महिने त्यांना कर्जाचे हफ्ते भरण्याची आवश्यकता असणार नाही. ज्या कर्जदारांनी आतापर्यंत या योजनेचा लाभ घेतला नसेल, आणि त्यांचे उत्पन्न या परिस्थितीत कमी किंवा बंद झाले आहे, ते त्यांच्या कर्जाचे हफ्ते तीन महिन्यांसाठी पुढे ढकलून योजनेचा लाभ घेऊ शकतात.    

सद्यस्थितीत अर्थ बाजारातील स्पर्धा पाहता एचडीएफसीने कर्जाचे दर 7.50 टक्क्यांवर आणले आहेत. कमी झालेल्या दराचा लाभ ग्राहकांना मिळावा यासाठी बँकांनी गृह कर्जासोबतच अग्रगण्य क्षेत्राच्या कर्जाचे दर बाह्य मानक दराशी जोडावे, असे आरबीआयने म्हटले होते. बहुतांश बँका बाह्य मानक दरालाच त्यांचा रेपो रेट म्हणून निवडतात. स्टेट बँक ऑफ इंडियाने 8 मे रोजी नवीन गृह कर्जदारांना कर्जाचे दर 20 बीपीएसने वाढवले होते. कोरोना संकटामुळे धोका वाढला आहे आणि रिस्क प्रीमियम 20 बीपीएसनेवाढवल्याचे स्पष्टीकरण एसबीआयने दिले आहे.रेपो दरात कपात म्हणजे, निधीत कपात झाली असे म्हणता येणार नाही, मात्र चालू कर्जाच्या व्याज दरात आपोआप कपात लागू होणार असल्याचे काही बँकांनी स्पष्ट केले आहे. एकंदरीतच रिझर्व्ह बँकेने केलेली कपात सर्वसामान्य गृहकर्जदारांच्या पथ्यावर पडणार असून, नव्याने गृहकर्जघेणार्‍यांनाही त्याचा लाभ होणार आहे.

30 लाख रुपये कर्ज आणि 15 वर्षांची मुदत शिल्लक असेल तर त्यावर अतिरिक्त व्याज अंदाजे 2.34 लाख म्हणजेच आठ हप्त्यांइतकेच असेल. हा भार टाळण्यासाठी कमी झालेल्या व्याज दरांमुळे मदत होणार असून कर्जदारास दिलासाही मिळणार आहे.

रिझर्व्ह बँकेच्या घोषणेने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी 30 लाखांच्या कर्जावरील 7.4 टक्के व्याजदर आता 7 टक्क्यांवर येणार आहे. 30 ते 75 लाखांच्या कर्जाचा दर 7.65 टक्क्यांवरुन 7.25 टक्क्यांवर आणि 75 लाखांवरील कर्जाचा दर 7.75 टक्क्यांवरुन 7.35 टक्क्यांवर येईल.

ऑक्टोबर 2019 मध्ये गृह कर्ज रेपो दराशी जोडण्यात आल्याने व्याजदरात 1.4 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. 30 लाखांच्या कर्जावरील ईएमआय आता 22 हजार 855 रुपयांवरुन 19 हजार 959 रुपयांवर येईल. ऑक्टोबर 2019 च्या तुलनेत यात 2896 रुपयांची कपात झाली आहे. ज्या गृह निर्माण वित्तीय संस्था आणि बँकांनी आपले कर्जाचे दर रेपो दराशी जोडलेले नाहीत, त्यांच्याकडून ग्राहकांना कमी झालेल्या व्याज दराचा लाभ मिळणार नाही.