Fri, Apr 26, 2019 15:25होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अनैतिक संबंधातून प्रियकरानेच केला खून

अनैतिक संबंधातून प्रियकरानेच केला खून

Published On: Aug 19 2018 1:41AM | Last Updated: Aug 19 2018 12:54AMमनोर : वार्ताहर 

मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील ढेकाळे गाव हद्दीतील रस्त्याच्या कडेला पाण्याच्या डबक्यात एका अनोळखी महिलेचा अंगावर घाव असलेला मृतदेह सापडला होता. या खूनाबाबत उलगडा करण्यात मनोर पोलिसांना यश आले असून सदर महिलेची हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान, गणपत परशुराम गोंड (31)या आरोपीला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

याप्रकरणी मनोर पोलिसांनी मृत महिलेच्या पतीकडेे माहिती घेतली. त्यानंतर वाडा तालुक्यातील गायगोठा येथील गणपत परशुराम गोंड याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने प्रियंकाच्या खुनाची कबुली दिली. मृत प्रियंकासोबत त्याचे मागील वर्षभरापासून प्रेमसंबंध होते. यातून वाद झाल्याने तिचा खून केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. मनोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सिध्दवा जायभाये, पोलीस नाईक शिवाजी भोईर, उत्तम बिरारी, पी.एन.पोटे, सचिन गोल्हे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

पालघर तालुक्यातील मनोर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात येणार्‍या ढेकाळे गावाच्या हद्दीत 3 जुलैला एका अनोळखी महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. तोंडावर, कपाळावर वार तसेच मृतदेह कुजलेला असल्यामुळे प्रारंभी या महिलेची ओळख पटली नाही. दरम्यान, मनोर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरूध्द 302, 201 कलामाअंतर्गत गुन्ह्याची नोंद करून शोध सुरू करण्यात आला. त्यानंतर गणेशपुरी पोलीस ठाण्यातील मिसिंग तक्रारीवरुन तसेच महिलेच्या वर्णनावरून ती भिवंडी येथील प्रियंका प्रकाश सावंत (वय 30) असल्याचे पोलीस तपासात समोर आले. 29 जून रोजी प्रियंका बेपत्ता झाल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी गणेशपुरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.