मुंबईत ‘ब्रेक के बाद’ लॉकडाऊन?

Last Updated: Apr 07 2020 1:05AM
Responsive image


मुंबई: पुढारी वृत्तसेवा

मुंबई आता कोरोना विषाणूच्या साथीचा हॉटस्पॉट ठरला असून, याची जबर किंमत म्हणजे मुंबईतील लॉकडाऊन आणखी वाढू शकतो. 14 एप्रिलनंतर दोन तीन दिवसांचा ब्र्रेक घेऊन पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्याचा विचार शासनस्तरावर सुरू असल्याचे समजते. 

देशभरात 21 दिवस लॉकडाऊन सुरू असून तो 14 एप्रिलला संपेल. सोमवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक व्हीडीयो कॉन्फरन्सिंगद्वारे घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउन न वाढवण्याचे संकेत दिले. मात्र लॉकडाऊन उठवला गेला, तरी लॉकडाउनच्या काळातले निर्बंध सोशल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले.लॉकडाउन संपल्यानंतर काही महत्वाचे निर्णय घेतले जाणार असून त्यात नवी धोरणे लागू होण्याची शक्यता आहे.

14 तारखेनंतर राज्यातील लॉकडाऊन उठविला जाईल असे काही सांगता येत नाही. 10 तारखेनंतर राज्यात काय परिस्थिती निर्माण होते ते पाहून आणि केंद्राच्या सल्ल्यानुसार लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाईल असे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी स्पष्ट केले. त्यामुळे 15 तारखेपासून लॉक डाऊन शिथिल होण्याची शक्यता दुरावली आहे..

या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कठोर उपाय करण्याचे नियोजन सुरू केले आहे. येत्या 14 एप्रिलला देशव्यापी लॉकडाऊन संपणार असला, तरी मुंबईसह पुणे, नाशिक, पिंपरी चिंचवड अशा काही शहरांतील काही भाग पूर्णपणे सील करण्याचा विचार प्रशासनाने सुरू केला आहे.