Tue, Jun 18, 2019 20:44होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लोकलचे पुढील स्टेशन आता सुरत?

लोकलचे पुढील स्टेशन आता सुरत?

Published On: Sep 11 2018 1:38AM | Last Updated: Sep 11 2018 1:19AMमुंबई : प्रतिनिधी

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरू करण्याचे घाटले असतानाच आता मुंबईची लोकल थेट सुरतपर्यंत नेण्याचा विचार रेल्वे प्रशासन करत असल्याचे वृत्त आहे. मुंबई लोकल चर्चगेट ते विरार-डहाणू या मार्गावर धावतात. मात्र अनेक प्रवासी सुरत - मुंबई रोज अप-डाऊन करतात. याशिवाय सुरत ते मुंबई प्रवास करणार्‍यांची संख्याही हजारोंच्या घरात आहे. 

या प्रवासासाठी त्यांना फ्लाईंग राणीसारखे शटल रेल्वेचे पर्याय उपलब्ध आहेतच. पण आता येत्या काळात पश्चिम रेल्वेवर सुरत फास्ट लोकल सोडण्यात येण्याची शक्यता आहे. ही योजना तूर्तास पश्चिम रेल्वेच्या विचाराधीन असून या मार्गात कोणकोणत्या अडचणी येऊ शकतात, याचा आढावा सध्या घेतला जात आहे. 

रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने पुढारीला दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला डहाणू ते सुरत या मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर ही लोकल चालवण्यात येईल. विरारच्या पुढे रेल्वेचे दोनच मार्ग उपलब्ध आहेत. त्यामुळे विरार ते डहाणू मार्गावर तिसरा आणि चौथा मार्ग बनवण्याचा विचार सुरू आहे. त्यानंतर सुरत जलद लोकल सुरू करता येईल. ही लोकल सुरू झाल्यानंतर हळूहळू एक-एक शटल सेवा थांबवण्यात येईल आणि दर एका तासाने सुरतसाठी जलद लोकल सोडण्यात येईल.  सगळ्या योजना व्यवस्थितपणे कार्यान्वित झाल्या तर येत्या काही काळात मुंबई ते सुरत जलद लोकल धावू शकेल.