Mon, Aug 19, 2019 04:57होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महाराष्ट्रासमोर भारनियमनाचे संकट

महाराष्ट्रासमोर भारनियमनाचे संकट

Published On: Apr 11 2018 1:49AM | Last Updated: Apr 11 2018 1:43AMमुंबई : पुढारी वृत्तसेवा

उकाड्याचे प्रमाण कमालीचे वाढू लागलेले आहे. अशा उकाड्यात कोळशाच्या तुटवड्यामुळे महाराष्ट्राला वीजटंचाईचे संकट भेडसावण्याची शक्यता आहे. वाढते तापमान, त्यात विजेची वाढलेली मागणी आणि कोळशाचा तुटवडा असे तिहेरी संकट राज्यासमोर उभे राहिले आहे. महाराष्ट्र हे गरजेपेक्षा अधिक वीज उत्पादन करणारे राज्य असल्याचा दावा केला जात असला, तरी गेल्यावर्षीप्रमाणेच भारनियमनाची शक्यता आता वीज वितरण अधिकार्‍यांकडून व्यक्‍त केली जात आहे. 

रविवारी राज्यातील 12 औष्णिक ऊर्जा प्रकल्पांपैकी 3 प्रकल्पांत कोळशाचा गंभीर तुटवडा होता. इतर तीन प्रकल्पांत अवघे तीन किंवा चार दिवस पुरेल एवढाच कोळसा शिल्‍लक होता. याचा अर्थ राज्यातील औष्णिक ऊर्जा प्रकल्पांना केवळ उत्पादनासाठी पुरेल एवढाच कोळसा दिला जात आहे. मात्र आगामी काळात कोळशाची मागणी वाढणार असल्याने ही स्थिती गंभीर रूप धारण करू शकते, असे वीज उत्पादक कंपनी महाजनकोच्या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.  अधिकार्‍यांनी तयार केलेल्या आराखड्यानुसार महाजनकोच्या ऊर्जा प्रकल्पांकडे सध्या 8 लाख टन कोळसा शिल्‍लक असून, राज्यातील बहुसंख्य प्रकल्पांकडील कोळशाचा साठाही गंभीर म्हणावा इतका कमी आहे. तो दोन ते चार दिवस पुरेल. 

हे प्रमाण केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने निर्धारित केलेल्या प्रमाणापेक्षा खूप कमी आहे. प्राधिकरणाच्या प्रमाणानुसार प्रत्येक प्रकल्पाकडे 25 ते 30 दिवस पुरेल इतका साठा असणे आवश्यक असते.हे प्रमाण महाराष्ट्रात पाळलेच जात नसल्याने सध्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

13 हजार 607 मेगावॅट वीज निर्मितीची महाजनकोची क्षमता आहे. यापैकी बहुसंख्य वीज ही औष्णिक ऊर्जा प्रकल्पातून निर्मित केली जाते. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात विजेची मागणी 19 हजार मेगावॅट इतकी होती. महाजनकोच्या सात औष्णिक ऊर्जा प्रकल्पांतून एकूण क्षमतेच्या 59 टक्के विजेची निर्मिती करण्यात येत होती. ऐन उन्हाळ्यात विजेची मागणी 24 हजार मेगावॅटपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोळशाचा तुटवडा असाच राहिल्यास वीजटेचाईचा सामना करावा लागू शकतो. 

Tags : mumbai, mumbai news, load Shedding, crisis, Maharashtra,