होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गोरेगावात लिफ्‍टखाली पडून वृध्दाचा मृत्‍यू

गोरेगावात लिफ्‍टखाली पडून वृध्दाचा मृत्‍यू

Published On: Feb 23 2018 10:54AM | Last Updated: Feb 23 2018 10:54AMमुंबई : प्रतिनिधी

गोरेगाव पूर्वेकडील मोरारजी मिल म्हाडा संकुल या २१ मजली इमारतीच्या लिफ्टमधून पडून मोहन कदम (वय ६२) यांचा गुरुवारी सकाळी मृत्यू झाला. इमारतीच्या बंद पडलेल्या लिफ्टच्या दरवाजातून बाहेर पडताना लिफ्टचा दरवाजा व भिंतीच्या मोकळ्या जागेच्या पोकळीतून ते खाली कोसळले.

येथील संकुलाला ए व बी विंग आहेत. ए विंगमध्ये २० तर बी वींगमध्ये २१ मजले आहेत. या इमारतीतील रहिवासी मोहन कदम सकाळी सव्वासहा वाजता पाचव्या मजल्यावरून खाली येण्यासाठी लिफ्टमध्ये शिरले. परंतू पाचव्या व चौथ्या मजल्याच्या मध्येच लिफ्ट बंद पडली. त्यांना बाहेर काढण्यासाठी लिफ्टचा दरवाजा उघडण्यात आला. दोन मजल्यांच्या मध्येच अडकलेल्या लिफ्टमधून बाहेर पडताना कदम यांचा तोल गेला आणि ते खाली पडले. पुन्हा लिफ्ट सुरू होऊन ती खाली येण्याचा धोका असल्याने कदम यांना बाहेर काढण्याचा धोका कोणी पत्करला नाही. साडेसातच्या सुमारास अग्निशमन दलाच्या जवानांनी लिफ्टचा वीजपुरवठा बंद करून लिफ्टच्या पोकळीतून कदम यांना बाहेर काढण्यात आले. यावेळी ते गंभीर जखमी झाले होते. जखमी आवस्‍थेत उपचारासाठी त्यांना जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.