Sun, Jul 21, 2019 16:33
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लेप्टोपासून सावधान! अशी घ्या काळजी

लेप्टोपासून सावधान! अशी घ्या काळजी

Published On: Jun 29 2018 9:06AM | Last Updated: Jun 29 2018 9:06AMमुंबई : प्रतिनिधी

मुंबई शहराचा विस्तार जसजसा होत आहे, तसतसे शहरात गर्दी, अस्वच्छता, सार्वजनिक स्वछता संस्कारांचा अभाव या कारणांमुळे शहरात संसर्गजन्य आजार वेगाने बळावतात. पावसाळा सुरू झाल्याने असे आजार डोके वर काढण्याची शक्यता अधिक आहे. पालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात एका तरुणाचा लेप्टोने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. म्हणूनच मुंबईकरांनो जरा सावध रहा. स्वत:ची काळजी घ्या. रस्त्यावर साचलेल्या घाण पाण्यातून चालत घरी गेला असाल तर स्वत:ची काळजी घ्या.

संशयित लेप्टोस्पायरोसिसमुळे सायन रुग्णालयात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. असा संशय मुंबई महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी व्यक्त केला. याबाबत आरोग्य अधिकार्‍यांची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर मृत्यूचे खरे कारण समोर येणार आहे. सर्वांना पाऊस हवाहवासा जरी वाटत असला तरी साथीचे रोग पसरायला लागले, की मात्र हाच पाऊस मुंबईकरांना नकोसा होतो. मुंबईत जरासाही पाऊस पडला, तरी सखल भागात पाणी साचण्याचे प्रमाण अधिक असते. साचलेल्या पाण्यातच उंदीर, मांजर, कुत्रे किंवा इतर सस्तन प्राण्यांच्या मलमूत्राचे मिश्रण झाल्याने लेप्टो सारखे आजार मुंबईकरांना जडण्याची भीती असते. जागोजागी साचलेल्या अशा पाण्यातून मुंबईकरांना चालल्याने पाण्यातील बॅक्टेरिया शरीरात प्रवेश करून लेप्टोची लागण होते. लहान बालके आणि गरोदर महिलांना लेप्टोची लागण लवकर होत असते. तेव्हा काळजी घेण्याची अधिक गरज आहे.

लक्षणे

ताप, अंगदुखी, डोकेदुखी आणि पोटदुख

कोणती काळजी घ्याल

संसर्ग रोखण्यासाठी पावसाळ्यात साचलेल्या पाण्यातून जाऊ नये.
साचलेल्या पाण्यातून जाताना गमबूट घालावे.
उघड्या जखमांचा पाण्याशी संपर्क येणार नाही,याची काळजी घ्यावी.
लेप्टो या आजाराची लवकरच तपासणी करून घ्यावी

रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून चालल्यास ही औषधे घ्या

कमी जोखीम -

एकदाच पुराच्या पाण्यातून चाललेल्या, अंगावर जखम नसलेल्या व्यक्तींनी डॉक्सीसायकलीन (200 एमजी) ही कॅप्सूल पाण्यातून चालल्यानंतर 24 ते 72 तासांच्या
आत घेणे गरजेचे आहे.

मध्यम जोखीम-

पुराच्या पाण्यातून एकदाच चाललेल्या. अंगावर जखम असलेल्या किंवा तोंडात दूषित पाणी गेलेल्या व्यक्तींनी डॉक्सीसायकलीन (200 एमजी) ही कॅप्सुल दिवसातून 1 वेळा 3 दिवस घेणे गरजेचे आहे.

अति जोखमीचा गट-

एकापेक्षा अधिक वेळा पुराच्या पाण्याशी संपर्कात आलेल्या विशेषत: शहरी भागातील घनकचरा उंदीर असलेल्या भागात, पुराचं पाणी तोंडात गेल्यास. घनकचरा व्यवस्थापन विभागातील व्यक्ती. डॉक्सीसायकलीन (200 एमजी) आठवड्यातून एकदा 6 आठवड्यांपर्यंत घेत राहणे फायदेशीर ठरू शकते.

गरोदर महिला किंवा मध्यम जोखीम-

पुराच्या पाण्यातून एकदाच चाललेल्या. अंगावर जखम असलेल्या/नसलेल्या किंवा तोंडात दूषित पाणी गेलेल्या व्यक्तींनी कमी जोखीम- अ‍ॅजीत्रोमायसिन (500 एमजी) एकदा 24 ते 72 तासांच्या आत आणि मध्यम जोखीम असलेल्यांनी- अ‍ॅजीत्रोमायसिन (500 एमजी)दिवसातून 1 वेळा 3 दिवस घेणे फायदेशीर ठरेल.

8 वर्ष आणि कमी वयाची मुले : पुराच्या पाण्यातून एकदाच चाललेल्या. अंगावर जखम असलेल्या/नसलेल्या किंवा तोंडात दूषित पाणी गेलेल्या व्यक्तींनी कमी जोखीम- सिरप अ‍ॅजीत्रोमायसिन (200 एमजी) किंवा कॅप्सूल अ‍ॅजीत्रोमायसिन (250 एमजी) एकदाच 24 ते 72 तासांमध्ये. मध्यम जोखीम- सिरप जीत्रोमायसिन (200 एमजी) किंवा कॅप्सूल अ‍ॅजीत्रोमायसिन (250 एमजी) दिवसातून 1 वेळा 3 दिवसांकरता घेतली पाहिजे.