Tue, Jul 16, 2019 09:58होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सोगवेत बिबट्या जेरबंद

सोगवेत बिबट्या जेरबंद

Published On: Jan 18 2018 1:57AM | Last Updated: Jan 18 2018 1:04AM

बुकमार्क करा
डहाणू : वार्ताहर

डहाणू तालुक्यातील सोगवे-चढावपाडा येथे शिकार्‍याच्या तारेच्या फासात अडकलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात डहाणू वनविभाग व वाईल्डलाईफ कंझर्वेशन अ‍ॅन्ड अ‍ॅनिमल वेल्फेअर असोसिएशनला यश आले.

सोगवे-चढावपाडा येथे गट क्र. 11 मध्ये हेमंत चंपकलाल बाबु यांच्या चिकुवाडीत मंगळवारी रात्री रानडुक्कर पकडण्याचा तारेच्या सापळ्यात बिबट्या फसला. बुधवारी सकाळी 8 च्या सुमारास बिबट्याचा आवाज ऐकून सोगवेतील ग्रामस्थ दिनेश वळवी यांनी पाहिल्यानंतर वनविभागाला कळवले. हे वृत्त परिसरातील गावांमध्ये पसरताच भितीचे वातावरण निर्माण झाले. डहाणू वनविभागाचे पथक आणि वाईल्डलाईफ कंझर्वेशन अ‍ॅन्ड अ‍ॅनिमल वेल्फेअर असोसिएशन यांनी वन्य प्राण्यांच्या रुग्णवाहिकेतच पिंजरा लावण्याची सुविधा असल्याने थेट घटनास्थळी सव्वा अकराच्या सुमारास पिंजरा लावला. दुपारी पावणेदोनच्या सुमारास फासात अडकलेल्या बिबट्याच्या कमरेची लोखंडी तार सोडल्यानंतर थेट पिंजर्‍यात जाताच दरवाजा लावण्यात आला आणि ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. बिबट्याला डहाणू, पारनाका येथील उपवन संरक्षक कार्यालयाच्या कासव पुनर्वसन केंद्रात नेण्यात आले.

कमरेला जखम नसून तो पाच ते सहा वर्षीय नर जातीचा पूर्ण वाढ झालेला बिबट्या आहे. त्याचे वजन साधारण 50 किलो आहे, अशी माहिती सहाय्यक वनरक्षक डी. जे. पवार यांनी दिली. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वाईल्ड लाईफ कंझर्वेशन अ‍ॅन्ड अ‍ॅनिमल वेल्फेअर असोसिएशनचे मानद वन्यजीव रक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली धवल कंसारा, एरिक ताडवाला, पूर्वेश तांडेल, प्रतीक वाहूरवाघ, सागर पटेल, रेमंड डिसोझा, कुणाल पारेख, गणेश शिनवार तसेच डहाणू वनपरिक्षेत्र अधिकारी उत्तम शिंदे, मोहन मोडवे, समाधान पाटील यांनी सहभाग घेतला. यावेळी डहाणू पंचायत समितीचे सभापती राम ठाकरे, पशुधन अधिकारी राहुल संख्ये, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे पशुधन अधिकारी मनीष पिंगळे उपस्थित होते.