Sun, Mar 24, 2019 13:00होमपेज › Mumbai-Thane-Raigad › यंदा विधान परिषदेचा आखाडा रंगणार; मातब्‍बरांत चुरस

यंदा विधान परिषदेच्या आखाड्यात दिग्‍गजांचा शड्‍डू

Published On: Jan 18 2018 4:21PM | Last Updated: Jan 18 2018 4:21PMरायगड : विशेष प्रतिनिधी

यंदाचे २०१८ हे वर्ष राजकारणाच्या फडात चांगलेच तापणारे असणार आहे. येत्या काही महिन्यांत विधान परिषदेच्या २२ जागांसाठी निवडणूक होणार असून सत्ताधार्‍यांसह विरोधकही जोर लावण्याच्या तयारीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळ प्रवेशावर डोळे लावून बसलेल्या नारायण राणे यांच्यासह सर्वपक्षीय दिग्‍गजांमध्ये राजकीय कलगीतुराही रंगणार आहे. ही निवडणूक शेकाप नेते जयंत पाटील, राष्‍ट्रवादीचे सुनील तटकरे, शिवसेनेचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत आणि काँग्रेस नेते व विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे अशा मातब्‍बरांसाठी महत्त्‍वाची ठरणार आहे. 

याशिवाय शिवसेना उपनेते अॅड. अनिल परब, कॉंग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते शरद रणपिसे यांनाही उमेदवारीसाठी झगडावे लागणार आहे.

विधान परिषदेतील हे सदस्य होणार निवृत्त

येत्या मे, जून, जुलै २०१८ या तीन विधान सभा मतदार संघातून व स्‍थानिक स्‍वराज्य, पदवीधर मतदार संघातून निवडून आलेल्या विधान परिषद आमदारांचा कार्यकाळ संपणार आहे. या निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये अनुक्रमे जयंत पाटील (शेकाप), सुनील तटकरे (राष्ट्रवादी), अनिल परब (शिवसेना), माणिकराव ठाकरे (कॉंग्रेस), पशुसंवर्धन दुग्धविकास खात्याचे मंत्री महादेव जानकर, शरद रणपिसे (कॉंग्रेस), विजय गिरकर (भाजप),  संजय दत्त (कॉंग्रेस), जयदेव गायकवाड (राष्ट्रवादी), नरेंद्र पाटील (राष्ट्रवादी), अमरीश पंडीत (राष्ट्रवादी), गोपीकिशन बजोरीया (शिवसेना) हे विधानसभा मतदार संघातून निवडून आलेले सदस्य आहेत. 

तर कोकण स्वराज्य संस्थांमधून निवडून आलेले अनिल तटकरे (राष्ट्रवादी), मुंबई पदवीधरमधून निवडून आलेले डॉ. दीपक सावंत, परभणी पदवीधरमधून आलेले राष्ट्रवादीचे अब्दुल्ला खान, अमरावती स्वराज्य संस्था मतदार संघातून निवडून आलेले भाजपचे मंत्री प्रविण पोटे, भाजपचे वर्ध्यातून निवडून आलेले नितेश भंगाडिया, शिक्षक आमदार कपिल पाटील, कोणक पदवीधरमधून निवडून आलेले निरंजन डावखरे (राष्ट्रवादी), नाशिक स्वराज्य संस्थेतील जयंतराव जाधव, लातूरचे दिलीप देशमुख (कॉंग्रेस) हे सर्व सदस्य निवृत्त होत आहेत.

भाजपला फायदा, र्कॉग्रेस, राष्‍ट्रवादीला फटका

२०१८ मध्ये निवडणूक होणार्‍या विधान परिषदेच्या जागांवर भाजपला फायदा होण्याची शक्यता आहे. एकूण २२ जागांसाठी होणार्‍या निवडणुकीचा लाभ होऊन भाजपचा सध्याचा असणार्‍या १८ जागांमध्ये वाढ होऊन ते २३ पर्यंत जाणार आहेत. तर काँग्रेस आणि राष्‍ट्रवादी काँग्रेसच्या जागांमध्ये घट होणार आहे. 

विधान परिषदेतील सध्याचे पक्षीय बलाबल

सध्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या ७८ जागांमध्ये राष्‍ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक २३ आमदार आहेत. तर त्यानंतर काँग्रेसचे १९, भाजप १८, शिवसेना ९, अपक्ष ६, लोकभारती १ आणि इतर २ असे आमदार आहेत. 

विधान परिषदेचे १२ आमदार २०२० ला निवृत्त

मागील आघाडी सरकारने जाता जाता नेमलेले १२ राज्यपाल नियुक्‍त आमदार आहेत. त्यांची मुदत २०२० ला संपणार आहे. यामध्ये राष्‍ट्रवादी ६, काँग्रेस ५ आणि इतर एक अशा १२ आमदारांचा कार्यकाल संपत आहे. 

या नॉमिनेटेड आमदारांमध्ये प्रकाश सूर्यभान गाजभिये, विद्या चव्हाण, राहूल नार्वेकर, ख्वाजा बैग, रामराव वाडकुटे, जग्गनाथ शिंदे, हूस्नबानू निझामुद्दीन खालीफे, अनंत गाडगीळ, जनार्दन चांदूरकर, आनंदराव रघोजी पाटील, रामहरी गोविंदराव रूपानवर, जोगेंद्र कवाडे यांचा समावेश आहे. हे सर्व आमदार २०२० ला निवृत्त झाल्यानंतर नव्याने येणाऱ्या सरकारला नवे आमदार नेमता येतील.

कोकणातील मातब्‍बरांची प्रतिष्‍ठा पणाला

आगामी विधान परिषद निवडणूक ही राज्यातील मातब्‍बर नेत्यांसाठी प्रतिष्‍ठेचे ठरणार आहे. शेकाप नेते जयंत पाटील यांचा कार्यकाळ १८ जुलैला संपत आहे. तर २७ जुलैला सुनील तटकरेंचा कार्यकाळ संपत आहे. काँग्रेस विरोधात बंड करून तीन महिन्यांपूर्वीच आमदारकीचा राजीनामा देणारे नारायण राणे यांच्यासाठीही ही निवडणूक महत्त्‍वाची आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोकणातील तीन तुल्यबळ नेत्यांची प्रतिष्‍ठा टांगणीला असणार आहे. त्यामुळे हे तिन्‍ही नेत्या पुन्‍हा विधान परिषदेसाठी आग्रही असणार आहेत.

राष्ट्रवादी आणि शेकाप आघाडी असल्याने एकाच वेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शेकापचे जयंत पाटील यांना निवडून आणण्याचे आव्हान या दोन पक्षांवर आहे. या दोघांचे विधानसभेत ४३ आमदार आहेत. दोन जागांच्या विजयासाठी ५० आमदारांची गरज लागणार आहे. 

कोकणात आघाडी-युतीमध्ये रस्‍सीखेच

स्वराज्य संस्था मतदार संघात कोकणात १ हजार मतदार आहेत. नारायण राणे आणि भाजप यांच्याकडे यातील ३०० मते आहेत. कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शेकापकडे जवळपास ५०० मते आहेत. तर शिवसेनेकडे जवळपास २०० पेक्षा जास्त मते आहेत. त्यामुळे या मतदारसंघात आघाडी-युतीमध्ये जोरदार रस्सीखेच होईल. याशिवाय कोकण पदवीधर  मधील आमदार निरंजन डावखरे यांचीही निवडणूक याचवेळी होत आहे. 

कोकण स्वराज्य मतदार संघातील राष्ट्रवादीचे आमदार आणि सुनील तटकरेंचे बंधू अनिल तटकरे यांना पुन्हा तिकीट मिळण्याची शक्यता कमी असल्याने या जागेवर वेगळा उमेदवार येईल. 

कोकणात भाजपला यशाची आशा

कोकणात या विधान परिषद निवडणूकीचा सर्वाधिक परिणाम जाणवणार आहे. भाजपला या ठिकाणी सर्वाधिक आशा असणार आहेत. सध्याच्या संख्या बळाप्रमाणे भाजपचे ६ आमदार निवडून येऊ शकतात. तर शिवसेनेचे २, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे ३ व अन्य १ आमदार निवडून येऊ शकतात. यामध्ये शिवसेनेकडे १२ मते ज्यादा तर कॉंग्रस व राष्ट्रवादीकडे ५ मते ज्यादा आहेत. अन्य ७ मते असल्याने एकत्रितपणे एक आमदार निवडून येवू शकेल.