Sat, Apr 20, 2019 08:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पृथ्‍वीराज देशमुखांचा अर्ज मागे; विधान परिषदेचे चित्र स्‍पष्‍ट

पृथ्‍वीराज देशमुखांचा अर्ज मागे; विधान परिषदेचे चित्र स्‍पष्‍ट

Published On: Jul 09 2018 11:50AM | Last Updated: Jul 09 2018 11:51AMमुंबई : पुढारी ऑनलाईन

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी होणार्‍या निवडणुकीचे चित्र जवळजवळ स्‍पष्‍ट झाले आहे. भाजप उमेदवार पृथ्‍वीराज देशमुख यांनी उमेदवारी मागे घेतल्याने निवडणूक बिनविरोध होणार आहे. त्यामुळे दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर आता राष्‍ट्रीय समाज पक्षाच्या चिन्‍हावरच ही निवडणूक विजयी होतील. 

महादेव जानकर हे गतवेळी भाजपच्या चिन्‍हावर विधान परिषदेवर निवडून आले होते. परंतु यावेळी त्यांनी राष्‍ट्रीय समाज पक्षाच्या चिन्‍हावर निवडणूक लढविण्याची भूमिका घेतली होती. तर भाजप नेते जानकर यांनी भाजपच्या चिन्‍हावरच निवडणूक लढवावी यासाठी आग्रही होते. त्यामुळे भाजपने सावधानी बाळगत दगाफटका टाळण्यासाठी सांगलीचे भाजप जिल्‍हाध्यक्ष पृथ्‍वीराज देशमुख यांच्या रुपाने एक अतिरिक्‍त उमेदवार दिला होता. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होण्यावर प्रश्‍नचिन्‍ह होते. 

आता ही विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार आहे. भाजप वगळता सर्वच पक्षांनी विधानसभेतील आपापल्या संख्याबळानुसार उमेदवार दिले होते. ११ जागांमध्ये सत्ताधारी भाजपच्या सर्वाधिक पाच, शिवसेना दोन, काँग्रेस दोन, राष्ट्रवादी एक, तर शेकाप एक मिळून ११ उमेदवार निवडून जाऊ शकतात. मात्र, भाजपने सहा उमेदवारांचे अर्ज भरले होते. देशमुखांनी अर्ज मागे घेतल्याने आता भाजपच्या एका जागेवर राष्‍ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर बिनविरोध विजयी ठरतील.