Sun, Jul 21, 2019 09:54होमपेज › Mumbai-Thane-Raigad › इंदू मिलची जमीन अद्यापही केंद्र सरकारकडेच!

इंदू मिलची जमीन अद्यापही केंद्र सरकारकडेच!

Published On: Jun 19 2018 1:44AM | Last Updated: Jun 19 2018 1:41AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे इंदूमिलच्या जमीनवर स्मारक उभारण्यात येणार असले तरी या जमिनीचे अद्यापही केंद्र सरकारकडुन हस्तांतरण झालेले नाही. तसेच एमएमआरडीएकडून स्मारक बांधकामाचा नकाशाही मंजुर झाला नसल्याचे उघडकीस आले आहे.     

विधानपरिषदेच्या सोमवारी झालेल्या विनंती अर्ज समितीच्या बैठकीत ही गंभीर उघड झाली. या बैठकीत आमदार प्रकाश गजभिये यांनी स्मारकाच्या जमिनीचे हस्तांतरण आणि स्मारकाचा नकाशा मंजुर का झाला नाही, असा मुद्दा उपस्थित केला होता. विनंती अर्ज समितीचे अध्यक्ष विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी अधिकार्‍यांना या प्रश्‍नांचे उत्तर देण्यास सांगितले. त्यावर नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर यांनी इंदूमिलची संपूर्ण जागा 4.84 हेक्टर असल्याचे सांगितले. त्यापैकी 2.03 हेक्टर जागा अजूनही सीआरझेड क्षेत्राच्या कचाटयात आहे.सीआरझेड क्षेत्राची मर्यादा 100 मिटरपर्यंत बाधित असते. त्यामुळे त्या जागेस अजूनही मंजूरी नाही व सीआरझेड क्षेत्राबाहेरील 2.83 हेक्टर क्षेत्र हे प्रस्तावित स्मारकासाठी आरक्षित असल्याबाबत आदेश काढला असल्याची माहिती करीर यांनी दिली. एमएमआरडीएच्या अधिकार्‍यांनी जागेचे हस्तांतरण न झाल्यामुळे स्मारकाच्या बांधकामाचा नकाशा मंजूर झाला नसल्याचे सांगितले. केंद्र व राज्य शासनामध्ये झालेल्या करारानुसार नगररचना विभागाच्या संचालकांनी निर्धारित केल्याप्रमाणे 1413.48 कोटी रुपये जमीनीचे मुल्यांकन केले आहे. टीडीआर विक्रीव्दारे राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळास प्राप्त होईल.

जर तेवढी रक्कम टीडीआरव्दारे मिळाले नाही तर महाराष्ट्र शासन वस्त्रोद्योग महामंडळाला देईल. परंतु मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे अजुनही जागा हस्तांतरीत झालेली नाही. तसेच टीडीआरचा निधी वस्त्रोद्योग महामंडळाला मिळालेला नाही. त्यामुळे जागेचे हस्तांतरणाची प्रक्रिया रखडली आहे. राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाकडून प्रस्ताव प्राप्त होत नाही तोपर्यंत हस्तांतरणाबाबतची औपचारीकता पूर्ण होवू शकत नाही, असेही एमएमआरडीएच्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.