Fri, Apr 26, 2019 01:22होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महाड : डोंगरमाथ्यावर जमिनीला २०० ते ३०० मीटरच्या भेगा(Video)

महाड : डोंगरमाथ्यावर जमिनीला २०० ते ३०० मीटरच्या भेगा(Video)

Published On: Jul 18 2018 9:26PM | Last Updated: Jul 18 2018 9:41PMमहाड : प्रतिनिधी

महाड तालुक्यातील पारमाची गावाजवळील चार दिवसापूर्वी झालेल्या भूस्कलन व रस्ता खचल्याचे प्रकरण ताजे असतानाच या गावापासून सुमारे 10 किमीच्या परिसरात येणाऱ्या आंबेशिवथर, धनगरवाडी, सह्याद्रीवाडी येथील डोंगरमाथ्यावरील जमिनीला सुमारे 200 ते 300 मीटर परिसरात भेगा गेल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले असून यामुळे येथून जवळ असणाऱ्या धनगरवाडी वस्तीस धोका निर्माण झाला आहे. गेल्या चार दिवसातील या दुसऱ्या प्रकाराने तालुक्यातील जनतेमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

दरम्यान तालुक्यातील घडणाऱ्या या घटना लक्षात घेऊन दरडग्रस्त व भूस्कलन होणाऱ्या भागांची भूगर्भीय वैज्ञानिकांकडून सरकारने पाहणी करावी अशी मागणी आपण केल्याची माहिती महाडचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे. दरम्यान या तालुक्यातील या प्रकाराने जनतेने सतर्क राहण्याची आवश्यकता प्रशासकीय पातळीवरून व्यक्त होत आहे. 

महाड तालुक्यातील वरंध विभागात पारमाची गावाजवळ चार दिवसांपूर्वी झालेला रस्ता खचण्याचा प्रकार ताजा असताना बुधवारी दुपारी या गावापासून सुमारे 10 किमी अंतरावर असणाऱ्या आंबेशिवथर, धनगरवाडी, सह्याद्रीवाडीच्या ग्रामस्थांना डोंगरमाथ्यावर फिरतांना सुमारे 200 ते 300 मी. लांबीचे जमिनीला तडे गेल्याचे व परिसरातील जमीन खचल्याचे दिसून आले. स्थानिक ग्रामस्थांनी त्याची माहिती महाड तहसील कार्यालयाला दिल्यानंतर तहसीलदार चंद्रसेन पवार यांनी मंडल निरीक्षक, तलाठी, ग्रामसेवक व गावातील संबंधित नागरिकांसह घटनस्थळाला भेट देण्यासाठी रवाना झाल्याची माहिती महाड आपत्ती निवारण कक्षाकडून प्राप्त झाली आहे. 

या घटनेसंदर्भात संबंधित जागे पासून 100 मी. वर असणाऱ्या धनगरवाडी,­ सह्याद्रीवाडी येथील नागरिकांना सतर्कतेचे इशारे देण्यात आले आहेत. येथील धनगरवाडीमध्ये प्राप्त झालेल्या माहितीनुसार सुमारे 25 कुटुंबे राहत असून 100 च्यावर येथील लोकसंख्या असल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून आपत्ती निवारण कक्षातून संबंधित भागातील अधिकाऱ्यांना या परिसरात राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.

एकूणच महाड तालुक्यातील या दोन घटनांनी तसेच वरंध भागात प्रथमच अशा घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याची दखल घेऊन नागरिकांनी सर्तक व सावधान राहावे, असे आवाहन स्थानिक प्रशासनामार्फत जनतेला करण्यात आले आहे.