Mon, May 27, 2019 01:41होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लाळ्या-खुरकत लस खरेदीवरून मंत्री महादेव जानकरांचा माफीनामा!

लाळ्या-खुरकत लस खरेदीवरून मंत्री महादेव जानकरांचा माफीनामा!

Published On: Mar 09 2018 2:06AM | Last Updated: Mar 09 2018 1:11AMमुंबई : प्रतिनिधी

गाई-म्हशी व शेळ्या-मेढ्यांना आवश्यक असलेला लाळ्या-खुरकत आजारावरची लस खरेदी निविदा प्रक्रियेत अडकल्याने जनावरांना वेळेत ती उपलब्ध झाली नाही. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊनही अद्याप चौकशी सुरू झाली नाही. लस खरेदी प्रकरणात झालेल्या दिरंगाईबाबत पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी राज्यातील शेतकर्‍यांची विधानपरिषदेत जाहीर माफी मागितली. 

लाळ्या-खुरकत लसीच्या प्रकरणावरून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सुनील तटकरे, काँग्रेसचे भाई जगताप आदी सदस्यांनी तारांकित प्रश्‍नाच्या माध्यमातून प्रश्‍न उपस्थित करत पशुसंवर्धन मंत्र्यांची कोंडी केली.  लस खरेदीच्या निविदा प्रक्रियेत जाणीवपूर्वक घोळ घालणार्‍या अधिकार्‍यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी. इंडियन इम्युनॉलॉजी कंपनीला यामध्ये का? वगळण्यात आले याबाबत विरोधी सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नांना राज्यमंत्री अर्जन खोतकर तसेच मंत्री जानकर यांच्याकडून कोणतीही समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने अखेर सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी अधिवेशन संपण्यापुर्वी यासंदर्भात अहवाल सादर करा, असे निर्देश दिले.