Mon, Aug 19, 2019 11:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लालबागचा राजा यंदा देणार पर्यावरण वाचविण्याचा संदेश

लालबागचा राजा देणार पर्यावरण वाचविण्याचा संदेश

Published On: Sep 12 2018 2:07AM | Last Updated: Sep 12 2018 2:07AMमुंबई : प्रतिनिधी

यंदा लालबागचा राजा हा पर्यावरण वाचविण्याचा संदेश देणारा आहे. ग्लोबल वार्मिंगमुळे जगात सर्वत्र मानवाला प्रचंड धक्के बसत असून यामधून वाचायचे असल्यास निसर्ग सांभाळला पाहिजे, असा संदेश करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असणारा लालबागचा राजा देणार आहे. 1987 मध्ये लालबागचा राजा नेहमीच्या सिंहासनाऐवजी खडकावर विराजमान झाला होता. 30 वर्षांनंतरही आता राजा शिळेवर बसून भक्तांच्या इच्छा पूर्ण करणार आहे. मात्र या इच्छा पूर्ण करताना बाप्पा करोडो भाविकांना निसर्गाचे महत्त्व पटवून देईल.

मंगळवारी लालबाग राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने मंगळवारी लालबागच्या राजाचे फोटोसेशनसाठी राजाची पहली झलक प्रसिद्धी माध्यमांसाठी खुली केली. यावेळी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींसह जनतेनेही आपल्या राजाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली. मूर्तीकार संतोष कांबळी यांच्या संकल्पनेतून साकारण्यात येणार्‍या लालबागच्या राजाच्या मूर्तीसह प्रभावळदेखील आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहेत. वेगवेगळ्या रुपात तयार करण्यात येणार्‍या या प्रभावळीच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्यात येतो. मात्र यंदा मंडळाने पर्यावरण स्नेही सजावटीचा ध्यास घेतल्याने या प्रभावळीत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

मुंबईसह देशविदेशातील करोडो गणेशभक्तांचे श्रध्दास्थान असलेला लालबागच्या राजाची प्रसन्न मूर्ती हे नेहमीच सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली आहे. भक्तांना आपल्या नजरेतून आशीर्वाद देणारी आसनाधिष्ठीत ही मूर्ती आणि तिच्या वेगवेगळ्या आकर्षक प्रभावळ हा कला जगतात एक मोठा ट्रेडमार्क झाला आहे. मात्र यंदा जगप्रसिद्ध असलेली ही लालबागच्या राजाची मूर्ती प्रभावळविना आहे. राजाच्या अंगाखांद्यावर खेळणारा निसर्ग असाच खेळता ठेवण्याची जबाबदारी माणसांचीच आहे. 

गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळ्या आकारात आणि रुपात राजाची प्रभावळ तयार केली जात असताना यंदा प्रभावळविनाच मंडपात विराजमान होणार आहे. मंडपात प्रभावळ नसली तरी विसर्जन मिरवणुकीसाठी विशेष प्रभावळ तयार करण्यात येईल आणि तब्बल 22 तास चालणार्‍या विसर्जन सोहळ्यात लालबागचा राजा झगमगत्या प्रभावळीसह लोकांना दर्शन देईल. गणेशोत्सवाच्या तयारीत संपूर्ण मुंबापुरी न्हाऊन निघाली आहे. मुंबई आणि गणेशोत्सव यांचे एक वेगळे अतूट नाते असून यात सर्वांचे लक्ष लागून राहिले असते ते लालबागच्या राजाच्या दर्शनाचे. नवसाला पावणारा राजा म्हणून ख्याती असणार्‍या लालबागच्या राजा सार्वजनिक मंडळाचे यंदाची तयारी कशी असणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना राजा निसर्गात न्हाऊन निघणार आहे, असे मंडळाच्यावतीने सांगण्यात आले. 

नितीन देसाईंनी साकारला पर्यावरणपूरक देखावा

प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई नेहमीप्रमाणे यंदाही लालबागच्या राजाच्या देखावा उभारला आहे.  मंडळाने पर्यावरणाचा संदेश देणारा देखावा उभा करण्याचे निश्चित केल्यानंतर देसाई यांनी आपल्या कलात्मक नजरेतून ऑगमेन्टेड रियालिटी तंत्रज्ञान माध्यमाने राजाला निसर्गमय केले आहे. यंदाचा हा देखावा अनेक वर्षे भाविकांच्या लक्षात राहील 1987 मध्ये अशा प्रभावळविना मूर्तीची साकारण्यात आली होती. त्यानंतर आता तब्बल 30 वर्षांनंतर असा प्रयोग होत आहे आणि विशेष म्हणजे या प्रयोगाबरोबरच ऑगमेन्टेड रियालिटी तंत्रज्ञान माध्यमातून गणपतीभोवती चारी बाजूंनी वर्षाव करणारा धबधबा, घनदाट जंगल, त्यामधून वाघ, सिंह, हरण, मोर असे पशू-पक्षी भक्तांच्या डोळ्याचे पारणे फेडतील.

- सुधीर साळवी, मानद सचिव, लालबागचा राजा सार्वजनिक मंडळ