होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लाल वादळाचा धसका!

लाल वादळाचा धसका!

Published On: Mar 12 2018 1:52AM | Last Updated: Mar 12 2018 1:52AMमुंबई : खास प्रतिनिधी

वर्षानुवर्षे आपल्या मागण्यांसाठी झगडणार्‍या शेतकर्‍यांनी नाशिकपासून सुरू केलेल्या लाँग मार्चने आज मुंबईत प्रवेश केला आणि मुंबईचा इस्टर्न फ्री वे लालजर्द रंगाने फुलून गेला. शिवसेनेने सरकारविरोधात निघालेल्या या महामोर्चाचे स्वागत मुंबईच्या वेशीवर केल्यानंतर सरकारकडून मोर्चेकर्‍यांना चर्चेचे आमंत्रण दिले असून किसान सभेच्या नेत्यांनी हे आमंत्रण स्वीकारले आहे. 

किसान मोर्चाच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यासाठी सहा मंत्र्यांची समिती स्थापन करण्यात आली असून मुख्यमंत्र्यांसह ही समिती सोमवारी मोर्चेकर्‍यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. सोमवारी विधान भवनातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोर्चेकर्‍यांशी त्यांच्या मागण्यांबाबत चर्चा करतील. हा मोर्चा चुनाभट्टीच्या सोमय्या मैदानावरून रात्रीच आझाद मैदानाकडे निघाला. सोमवारी चर्चा होईपर्यंत हे सर्व मोर्चेकरी आझाद मैदानातच तळ ठोकून राहतील.

मुख्यमंत्र्यांची समिती

मुख्यमंत्री फडणवीस यांनी रविवारी रात्री वर्षा बंगल्यावर उच्चस्तरीय बैठक घेतली. वरिष्ठ अधिकार्‍यांसह काही ज्येष्ठ मंत्री यावेळी उपस्थित होते. या बैठकीत आंदोलकांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक असल्याची भूमिका मांडण्यात आली. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचा या समितीमध्ये समावेश आहे.    

नाशिकहून पायपीट करत मुंबईच्या दिशेने निघालेल्या हजारो लाल बावटाधारक शेतकर्‍यांनी शनिवारी ठाण्यात प्रवेश केला. रात्री ठाण्याच्या वेशीवर असलेल्या आनंदनगर जकात नाक्याच्या मोकळ्या जागेत या मोर्चेकर्‍यांचा मुक्‍काम होता. 

रविवारी दुपारी मोर्चेकर्‍यांनी मुंबईत प्रवेश केला आणि विधानभवनाच्या दिशेने कूच केले. मात्र, विक्रोळीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे मोर्चेकर्‍यांना सामोरे गेले. किसान सभेचे नेते प्रा. अजित नवले आणि त्यांच्या सहकार्‍यांची महाजन यांनी भेट घेतली. 

सरकारशी चर्चेचे आमंत्रण किसान सभेच्या नेत्यांनी स्वीकारले असल्याचे महाजन यांनी सांगितले. सोमवारी मोर्चेकर्‍यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेईल, या भेटीतील चर्चेनंतर नक्‍कीच सकारात्मक तोडगा निघेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला.

चर्चा करण्याच्या सरकारच्या भूमिकेचे किसान सभेचे सरचिटणीस अजित नवले यांनी स्वागत केले. ‘देर आये, दुरुस्त आये’, आधीच सरकारने चर्चा केली असती, तर ही वेळच आली नसती. आता आम्ही चर्चेला तयार आहोत. मात्र, सरकारकडून मागण्यांबाबत कालबद्ध कार्यवाहीचे लेखी आश्‍वासन मिळाल्याखेरीज माघार घेणार नाही, असे नवले यांनी सांगितले. सरकारबरोबर चर्चा सुरू असतानाही आंदोलन सुरूच राहील, अशी माहिती त्यांनी दिली.