Sun, Mar 24, 2019 17:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कुंभार समाज मुंबईमध्ये एकवटला!

कुंभार समाज मुंबईमध्ये एकवटला!

Published On: Mar 06 2018 10:10AM | Last Updated: Mar 06 2018 9:58AMमुंबई : प्रतिनिधी

राज्यातील कुंभार समाजातील मातीकला कारागिरांना स्वयंरोजगार उत्पन्न करून देणे, संत शिरोमणी गोरोबाकाका महाराष्ट्र मातीकला बोर्ड स्थापन करणे, अशा विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र कुंभार समाज महासंघाच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील कुंभार समाजाने सोमवारी आझाद मैदानात मोर्चा काढून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

संत शिरोमणी गोरोबा मातीकला बोर्ड स्थापन करण्याची मागणी करणारा प्रस्ताव मंत्रालयात पाठवून अडीच वर्षे झाली. राज्य सरकारकडून कोणताही प्रतिसाद नसल्याने कुंभार समाजात मोठा असंतोष पसरला असल्याचे महासंघाचे अध्यक्ष संजय गाते म्हणाले. मातीकला बोर्डसाठी राज्यसरकारने अर्थसंकल्पात दरवर्षी 200 कोटींची तरतूद केल्यास राज्यातील कारागिरांना रोजगार मिळेल, अशी भूमिका उपाध्यक्ष उमाजी सुर्यवंशी यांनी मांडली.

कुंभार समाजाचा एन.टी.प्रवर्गात समावेश करावा, संत गोरोबाकाका यांचे जन्मस्थान तेर ढोकी, उस्मानाबाद तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करावे, मातीवरील रॉयल्टी माफ करावी, माती वाहतूक व विट भट्टी परवानाच्या जाचक अटी रद्द कराव्यात, वीटा, माती आणि मडकी विक्रीसाठी ग्रामपंचायत, नगरपालिका आणि महापालिका हद्दीतील दुकाने, मॉलमध्ये जागा उपलब्ध करून द्यावी, समाजातील 60 वर्षांवरील कारागिरांना मानधन द्यावे, विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय स्वतंत्र वस्तीगृहाची उभारणी करावी, चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोली या वनपरिक्षेत्र जिल्ह्यातील कुंभार समाजाला अत्यल्प दरात जळाऊ लाकूड उपलब्ध करून द्यावे, मुंबईतील धारावी कुंभारवाड्यास निवासी क्षेत्र जाहीर करून एमआयडीसी क्षेत्रात स्वतंत्र जागा उपलब्ध करून द्यावी, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.