Sun, Jul 21, 2019 10:18होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आता सामना ‘कोकण पदवीधर’मध्ये

आता सामना ‘कोकण पदवीधर’मध्ये

Published On: Jun 02 2018 2:02AM | Last Updated: Jun 01 2018 10:49PMमुंबई : खास प्रतिनिधी

भाजपने राष्ट्रवादीच्या निरंजन डावखरे यांना पक्षात घेऊन कोकण पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी दिल्यानंतर आता शिवसेनेने ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांना रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे पालघरच्या पोटनिवडणुकीत धूमशान झाल्यानंतर आता पदवीधर मतदारसंघात शिवसेना आणि भाजप यांच्यात पुन्हा एकदा असाच सामना रंगण्याची शक्यता आहे.

येत्या 25 जूनला कोकणासह विधान परिषदेच्या चार मतदारसंघात मतदान होणार आहे. राष्ट्रवादीचे निरंजन डावखरे हे कोकण पदवीधर मतदारसंघातून गेल्यावेळी विजयी झाले होते. राष्ट्रवादीतील स्थानिकांच्या राजकारणामुळे त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. लगेचच त्यांना भाजपची उमेदवारीही दिली गेली. गेल्यावेळी याच मतदार संघातून याच डावखरे यांनी भाजपच्या संजय केळकर यांचा पराभव केला होता. कोकण पदवीधर हा भाजपचा बालेकिल्ला मानला जात होता. त्यास भगदाड पाडणार्‍या डावखरेंनीच आता भाजपमधून उमेदवारी मिळवली आहे. डावखरे यांच्याविरोधात आज शिवसेनेने ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांना उमेदवारी दिली आहे. आता शिवसेना आणि भाजप यांच्यात पुन्हा एकदा जोरदार सामना रंगेल, असे दिसते. दरम्यान, राष्ट्रवादीकडूनही उमेदवार उतरवला जाणार असल्याची चर्चा असून, तसे झाल्यास तिरंगी सामना होऊन रंगत आणखी वाढणार आहे. शिवाय शेकापकडून जयंत पाटील यांच्या स्नुषा चित्रलेखा पाटील या पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरून आपला राजकारणाचा श्रीगणेशा करणार असल्याची चर्चा आहे. तसे झाल्यास नुकतीच आपल्या मुलासाठी शेकापची मदत घेणार्‍या सुनील तटकरेंना आता त्या मदतीची परतफेड करावी लागेल. त्यांना राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळेल, अशी शक्यता आहे.

डावखरे यांना उमेदवारी दिल्याने या मतदारसंघातील इच्छुक असलेले संदीप लेले, बाळ माने हे भाजपचे पदाधिकारी नाराज आहेत. त्यांच्या नाराजीचा फायदा आपल्याला मिळू शकतो, असे शिवसेनेचे गणित आहे.

कोकण पदवीधर मतदार संघातून आतापर्यंत रायगड आणि ठाणे जिल्ह्यातूनच उमेदवार दिला जात असे, आता रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनही इच्छुक आहेत.

मुंबई, कोकण विभाग पदवीधर आणि मुंबई व नाशिक विभाग शिक्षक अशा चार मतदार संघात ही निवडणूक होत असून, 7 जून ही उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. 8 जून रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होईल. 11 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येणार आहे. 25 जूनला मतदान व 28 जूनला मतमोजणी होणार आहे. कोकण विभाग पदवीधर मतदार संघात 97 हजारांपेक्षा अधिक पदवीधर मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यातील सर्वाधिक मतदार हे ठाणे व रायगड जिल्ह्यातील आहेत.