Mon, Nov 19, 2018 19:49होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मानखुर्दला भरगर्दीत पत्नीवर चाकूने वार !

मानखुर्दला भरगर्दीत पत्नीवर चाकूने वार !

Published On: Mar 07 2018 2:09AM | Last Updated: Mar 07 2018 1:32AMमुंबई : वार्ताहर

भरगर्दीत एका महिलेवर चाकूने हल्‍ला होत असतानाचा सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मानखुर्द रेल्वे स्थानकाबाहेर गेल्या सोमवारी घडलेल्या या घटनेत विजय इंगळे याने पत्नी शुभांगी(27)हिच्यावर चाकूने वार केले होते. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी मदतीसाठी पुढे न होता केवळ बघ्याची भूमिकाच बजावल्याचे व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे.

शिवाजीनगरातील झाकीर हुसेन नगरात विजय इंगळे व त्याची पत्नी शुभांगी एकत्र राहात होते. विजय  हा विक्रोळी येथे इलेक्ट्रिशियन म्हणून काम करतो. तर शुभांगी नवी मुंबईतील एका बँकेत सफाई विभागात काम करते.  त्या दोघांमध्ये नेहमीच वाद सुरू असायचे. पती सतत चारित्र्यावर संशय घेत असल्याने दोन महिन्यांपूर्वी शुभांगी आपले घर सोडून मानखुर्दच्या अण्णाभाऊ साठे नगरात आपल्या माहेरी आली. 

नेहमीप्रमाणे सोमवारी 28 फेब्रुवारीला सकाळी सव्वासातच्या सुमारास शुभांगी कामावर जाण्यासाठी मानखुर्द रेल्वे स्थानकाकडे निघाली. स्थानक परिसरातील टॅक्सी स्टॅन्डजवळ तिला अडवून विजयने तिच्या मानेवर व पाठीवर धारदार शस्त्राने वार केले. हा सर्व प्रकार सुरू असताना उपस्थित नागरिकांंपैकी कुणीही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला नाही.  काही वेळाने दाखल झालेल्या पोलिसांनी शुभांगीला उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तिथून पळून गेलेल्या विजयला गोवंडी स्थानकातून मानखुर्द पोलिसांनी अटक केली. सध्या तो पोलीस कोठडीत आहे.  गंभीर जखमी  झालेल्या शुभांगीवर  सायन रुग्णालयात उपचार  सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.