Tue, Feb 19, 2019 10:52होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘लाल वादळ’ आता ठाण्यात  

‘लाल वादळ’ आता ठाण्यात  

Published On: Mar 10 2018 7:35PM | Last Updated: Mar 10 2018 7:35PMठाणे - प्रतिनिधी 

कोणत्याही अटींशिवाय कर्जमाफी, शेतमालासाठी योग्य भाव, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी या प्रमुख मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेने विधानभवनावर लॉंग मार्च काढला आहे. शनिवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास ठाण्याच्या वेशीवर पोहोचला. या मोर्चामुळे मुंबई - नाशिक राष्ट्रीय मार्गावर एकेरी वाहतूक सुरू असल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. ही वाहतूक  सुरळीत झाल्यावर आम्ही रात्री ८.३० पर्यंत ठाण्यात पोहाचू, शनिवारी रात्री आनंदनगर नाक्यावर आमचा मुक्काम असल्याची माहिती सभेचे अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांनी दैनिक पुढारीशी बोलतांना दिली. 

आमच्या या मोर्चाला शिवसेना, मनसे, आप, रिपब्लिकन पार्टी (जोगेद्र कवाडे गट),कुणबी सेना, आगरी सेना, कुणबी प्रतिष्ठान यांनी पाठिंबा दिला असल्याचे ढवळेंनी  सांगितले.  या मोर्चाचे नेतृत्व डॉ. अशोक ढवळे यांच्यासह आमदार जे.पी. गावित, किसन गुजर, डॉ. अजित नवले करत आहेत. 

६ मार्चपासून सुरू झालेल्या या मोर्चात आतापर्यंत नाशिक, ठाणे, अहमदनगर, पुणे तसेच राज्याच्या अन्य भागातून ४० हजारांवर शेतकरी सहभागी झाले आहेत. गावोगावी जनतेकडून मिळणारा डाळ, तांदूळ अशा शिधा मिळत आहे, तोच शिधा आम्ही शिजवून खात आहोत. तसेच आतापर्यंत बहुतांशी मोर्चा हा ग्रामीण भागातून मार्ग्राकमण करत असल्याने विधीसाठी आम्ही डोंगराळ भागात गेलो, पण आता शहरी भागात तिथल्या स्थानिक यंत्रणांनी काही मोबाईल शौचालये पुरविली आहेत, असे त्यांनी सांगितले. आतापर्यंत आम्ही १२० किलोमीटर चाललो आहोत. शनिवारी रात्री ठाण्यातील आनंद नगर  जकात नाक्यावर आम्ही रात्रीचे जेवण करून विश्रांती घेणार आहोत. रविवारी  सकाळी मुंबईत प्रवेश करणार असून रात्री सौमय्या महाविद्यालयाच्या मैदानावर आमचा मुक्काम असणार आहे.