Mon, Jun 17, 2019 14:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राजस्थानच्या २ व्यापार्‍यांचे अपहरण

राजस्थानच्या २ व्यापार्‍यांचे अपहरण

Published On: Sep 11 2018 1:38AM | Last Updated: Sep 11 2018 12:55AMठाणे : प्रतिनिधी

राजस्थान उदयपूर येथील एका फायनान्स कंपनीच्या दोघा संचालकांना प्रॉपर्टी दाखवण्याच्या बहाण्याने ठाण्यात बोलावून त्यांचे 1 कोटीच्या रक्कमेसाठी अपहरण करणार्‍या टोळीच्या मुसक्या आवळण्यात ठाणे खंडणी विरोधी पथकास यश आले आहे. या टोळीच्या तावडीतून दोघा संचालकांची सुटका करण्यात आली असून खंडणीसाठी उकळलेले 25 लाख रुपये, पाच तलवारी आणि एक गाडी पोलिसांनी जप्त केली आहे.

लेनिन मुरली कुट्टीवटे (40, कोलशेवाडी, कल्याण), रोहित राजाराम शेलार (20, कल्याण), सागर साळवे (37, दिवा सागवे गाव), ओमप्रकाश जैस्वाल (23, लोकमान्य नगर, ठाणे), अभिषेक झा (40, कल्याण) आणि तुकाराम कुशाबा मुदगन (43, कल्याण) अशी अटक केलेल्या या खंडणीखोर टोळीतील सहा जणांची नावे आहेत. 

राजस्थान राज्यातील उदयपूर येथे राहणारे देवानंद वरंदानी आणि रोनक सैनी या दोघा व्यापार्‍यांची श्री तिरुपती फायनानिक्स निधी लिमिटेड नावाची कंपनी असून ही कंपनी प्रॉपर्टी गहाण ठेवून कर्ज देते. या कंपनीचा नंबर मिळवून आरोपींनी त्यांच्याशी संपर्क साधला व दोघा संचालकांना आपण बांधकाम व्यवसायिक असल्याचे भासवले. तसेच आपणास बांधकामासाठी मोठे कर्ज हवे असल्याचे सांगून दोघांना ठाण्यात प्रॉपर्टी दाखवण्यासाठी बोलावले. सदर कंपनीचे दोघे संचालक 7 सप्टेंबर रोजी ठाण्यात आले असता त्यांचे ठाणे स्थानकासमोरील अशोक टॉकीज येथून अपहरण केले. त्यानंतर त्यांना डोंबिवली येथील एका इस्टेट एजंटच्या कार्यालयात घेऊन गेले व तेथे दोघा संचालकांना तलवारीचा धाक दाखवून त्यांच्याकडून 1 कोटीच्या खंडणीची मागणी आरोपींनी केली. तसेच पैसे न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देखील दिली. 

खंडणीची रक्कम तडजोडीअंती 25 लाख ठरली. त्याप्रमाणे अपहरण केलेल्या व्यापार्‍यांचा एक मित्र 8 सप्टेंबर रोजी 25 लाखांची रोकड घेऊन कल्याण येथे आला. त्यावेळी या मित्राने खंडणीखोरांच्या गाडीचा नंबर घेऊन बोरिवलीच्या मित्राकडे पाठवला. त्याने ही घटना त्वरित ठाणे खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांना सांगितली. त्यानंतर या पथकाने सापळा लावून कल्याण येथून शेवरोलेट कार ताब्यात घेतली. त्यातून लेनिन मुरली कुट्टीवटे आणि रोहित राजाराम शेलार या दोघा आरोपींना अटक केली. त्यानंतर पोलिसांनी दोघा संचालकांना डांबून ठेवलेल्या ठिकाणी धाड टाकून दोघा व्यापार्‍यांची सुटका केली. याचवेळी पोलिसांनी घटनस्थळावरून 5 तलवारी, एक कार, व्यापार्‍यांकडून घेतलेली 70 हजाराची रोकड, एक चैन, एक अंगठी असा ऐवज जप्त केला. 

फिल्मी स्टाईल नियोजन

खंडणीसाठी दोघा संचालकांचे अपहरण केल्यानंतर आरोपींनी उदयपूर येथे संपर्क साधून संचालकांच्या एका मित्रास पैसे घेऊन कल्याण येथे बोलावले. यावेळी आरोपींनी 2 पेक्षा अधिक व्यक्ती येऊ नयेत, आम्ही सांगू तसे करावे आणि पोलिसांना खबर देऊ नये अशी अट घातली. दरम्यान, अपहरण झालेल्या दोघा व्यापार्‍यांचा मित्र पैसे घेऊन कल्याण येथे येताच आरोपींनी त्यास आपल्या गाडीतून उतरण्यास सांगून त्यांच्या गाडीत बसवले. मात्र याचवेळी पैसै घेऊन आलेल्या मित्राने आरोपींच्या कारचा क्रमांक लिहून तो बोरिवली येथील मित्रास पाठवला. त्यानंतर याच कारच्या वर्णनावरून पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या.