Sun, Dec 08, 2019 18:00होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पावसासाठी कानुबाई मातेला लावला कौल; अन् कळशी फिरली(Video)

पावसासाठी कानुबाई मातेला लावला कौल; अन् कळशी फिरली(Video)

Published On: Jul 20 2019 12:48PM | Last Updated: Jul 20 2019 12:49PM
नवी मुंबई : राजेंद्र पाटील 

जुलै महिना संपत आला तरीही पावसाने राज्‍याच्या अनेक भागात ओढ दिली आहे. यामुळे शेतीसोबतच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही आ वासून उभा ठाकला आहे. राज्यात मराठवाड्‍यासह विदर्भ आणि खानदेशात पावसाने गेल्या 15 दिवसापासून उसंत घेतल्याने पेरणी झाल्यानंतर पीक करपण्यास सुरूवात झाली. खानदेशात कपाशी, उडीद, मूग, सोयाबीन, मका, ज्वारी, बाजारी या पिकांसह लिंबूची बाग सुकली. यामुळे पारंपारिक पध्दतीने महिलांनी कानुबाई मातेला साकडं घालत 'माय पाणी कवह ई' अशी विचारणा केली.

खान्देशात कानुबाई मातेचे मोठे प्रस्थ आहे. श्रावणात कानुबाईचा उत्सव साजरा केला जातो. याच कानुबाईला पाण्यासाठी विनवणी करण्यात आली. यासाठी गहू जमिनीवर टाकून त्यावर तांब्याची कळशी ठेवण्यात आली. कळशीत पूर्ण पाणी भरून त्यामध्ये कानुबाईची मुर्ती ठेवली. पुजा केल्यानंतर सात किंवा पाच महिला एकत्र येऊन त्‍यांनी कळशीला हात लावून कानबाय माय की जय म्हणत 'पाणी कवह ई माय' असा ककौल लावला. प्रत्येक महिला वार विचारून कानुबाई काय कौल देते. याकडे लक्ष लावून होती. कानुबाईने कौल दिल्यानंतर कळशी गोल फिरते आणि त्यादिवशी पाऊस पडतो अशी लोकांची धारणा आहे.

हवामान खात्याने अंदाज वर्तवल्यानंतरही पाऊस न आल्याने शेतक-यांची घोर निराशा झाली आहे. पावसाने दडी मारल्‍यावर खान्देशात काही गावांमध्ये मारूतीच्या मंदिरात 11 किंवा 7 नद्यांचे, विहिरीचे पाणी आणून ते मंदीर पाण्याने पूर्ण भरले जाते आणि मंदिराचे दरवाजे बंद केले जातात. गेल्या दोन वर्षापूर्वी जळगाव जिल्ह्यातील  पारोळा तालुक्यातील टिटवी आणि पाचोरा तालुक्यातील भडगावमध्ये अशा पध्दतीने मंदिर पाण्याने भरले होते. यानंतर त्या दिवशी मुसळधार पाऊस झाला होता. असे येथील लोकांचे म्‍हणणे आहे. 

हवामान खात्‍याचेच अंदाज जेव्हा फोल ठरतात. तेव्हा आकाशाकडे नजरा लावून बसलेल्‍या बळीराजाकडे निसर्गाच्या चक्राला पुन्हा नीट करण्यासाठी देवाकडे जाण्याशिवाय दुसरा पर्याय राहात नाही. त्‍यातुनच मग अशा स्‍वरूपाच्या प्रथांकडे लोकांचा ओढा वाढतो आणि त्‍यातून अशा प्रार्थनेनंतर वरून राजाने हजेरी लावली, की मग लोकांचाही अशा प्रथांवरचा विश्वास आणखीन दृढ होतो.