Sat, Nov 17, 2018 02:16होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अभ्यास न केल्याने विद्यार्थ्याला बेदम मारहाण

अभ्यास न केल्याने विद्यार्थ्याला बेदम मारहाण

Published On: Dec 23 2017 2:33AM | Last Updated: Dec 23 2017 1:34AM

बुकमार्क करा

कल्याण : वार्ताहर

अभ्यास न केल्याने विद्यार्थिनीला तब्बल 500 उठाबशा काढण्याची शिक्षा दिल्याची घटना कोल्हापुरात घडली होती. या घटनेने पालक वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत असताना टिटवाळ्यात 7 वीच्या विद्यार्थ्यांने अभ्यास केला नाही म्हणून शिक्षकाने त्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. कृष्णा विजय धेनक (वय 13) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. टिटवाळ्यातील पुष्पाबाई चव्हाण एज्युकेशन ट्रस्टच्या राष्ट्रीय विद्यालयात गुरुवारी हा प्रकार घडला. मारहाणीमुळे सदर विद्यार्थ्याच्या पाठीवर वळ उठले असून संबंधित शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. 

याबाबत शिक्षक प्रवीण शेरगावकर यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी सदरील विद्यार्थी कृष्णा याने गणिताचा व्यवसाय अपूर्ण ठेवला असल्याने आपण त्याला किरकोळ मारहाण केल्याचे अरेरावीच्या भाषेत सांगितले. दरम्यान, कृष्णाच्या अंगावर वळ उठल्याचे फोटो दाखवल्याने तसेच त्याचे पालक पोलीस ठाण्यात तक्रार करणार असल्याचे सांगितले असता शेरगावकर यांनी सदर प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत जाऊ देऊ नका, पेपरला बातमी देऊ नका मी माझ्या परीने सदर विद्यार्थी व पालकांची समजूत काढतो अशी विनवणी केली. 

याबाबत मुख्याध्यापिका चेतना पाटील यांच्याकडे विचारणा केली असता आपल्याला याबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगून सदरील शिक्षकानेही आपल्याला काहीच माहिती दिली नसल्याचे सांगितले. याबाबत संबंधित शिक्षकांना विचारून सांगते. मात्र विद्यार्थीही वर्गात खूपच मस्ती करीत असल्याने त्यांना मारहाण करण्याशिवाय पर्याय नसतो, असे सांगून पाटील यांनी एक प्रकारे मारहाणीच्या घटनेला पाठिंबाच दर्शवला.