Fri, Apr 26, 2019 09:43होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पोटच्या पोरांनीच वृध्‍द आईला आणले रस्त्यावर!

पोटच्या पोरांनीच वृध्‍द आईला आणले रस्त्यावर!

Published On: Feb 20 2018 5:14PM | Last Updated: Feb 20 2018 5:14PMकल्याण : वार्ताहर

ज्‍या आईने रात्रंदिवस कष्‍ट करून आपल्‍या पोरांना लहानाचे मोठे केले. त्‍यांच्‍या सुखातच आपलं सुख शोधलं त्‍याच आईला शेवटी पोटच्‍या पोरांनीच रस्‍त्‍यावर आणले. तिच्‍या डोक्‍यावरचे छतही काढून घेतले. आणि निराधार म्‍हणून तिला जगायला भाग पाडले. अशा वृध्‍द आईचे डोळे पुसायलाही कोणी आले नाही. ही खरी घटना आहे. 

कल्याण पश्चिमेतील लाल चौकी परिसरात रस्त्याच्या कडेला एक वृद्ध महिला पडून असल्याचा कॉल नियंत्रण कक्षाला आला. या कॉलची तत्काळ दखल घेऊन सदरची माहिती लाल चौकी परिसरातील बाजारपेठ पोलिस ठाण्याला कळविली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तेथे पाय सुजलेल्या अवस्थेत एक वृद्ध महिला पडून असलेली दिसून आल्याने तिला पोलिसांनी प्रथम रुग्णवाहिका करून महापालिकेच्या रुक्‍मिणीबाई रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर प्रथमोपचार सुरु केले. तिची विचारपूस करण्यात सुरुवात केली. त्यावेळी ६५ वर्षीय वृद्धेने तिचे नाव रमाबाई दत्तात्रय खंडागळे आहे, असे सांगितले. तिने तिला दोन मुले असून एक मुलगी असून ती विवाहीत असल्‍याचे सांगितले. 

पोलिसांनी रिक्षा केली आणि तिच्या मुलांचा शोध सुरु केला. दिवसभराच्या शोधानंतर पोलिस दोन मुलांच्या घरी पोहचले. तिच्या एका मुलाचे नाव जितेंद्र तर दुसऱ्या  मुलाचे नाव विनोद असे आहे. मात्र ,तिच्या सूनाही तिला घरी घेऊन येऊ नका, असे म्हणाल्याने पोलिसांची आशा मावळली. दोन्ही मुले चांगल्या नोकरीला आहेत. नंतर पोलिसांनी त्यांनी तिच्या मुलीचा शोध घेतला. त्‍यावेळी मुलगी मीनाक्षी हिनेही माझ्‍या आईला माझ्‍या घरी आणू नका, असे बोलताच पोलिस सुन्न झाले. मीनाक्षी ही नर्सचे काम करते. 

अखेर, पोलिसच त्‍या वृध्‍देचे वारस झाले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र तायडे यांनी पोलिसांच्या मदतीने स्वखर्चाने रमाबाई यांना ठाणे सिव्हील रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविले आहे. रमाबाई या किडनीच्या आजाराने त्रस्त आहे. रमाबाई यांनी सांगितले की, दुसर्‍याच्या घरची कामे करुन मुलांना शिक्षण दिले. त्यांना मोठे केले. मुले आपल्या पायावर उभी राहिल्यावर मला आधार देण्‍याऐवजी मलाच निराधार केले. माझी प्रॉपर्टीही मुलांनी घेतली आहे.

रमाबाईने ही धक्कादायक माहिती दिल्यावर पोलिस पुन्हा तिच्या मुलांना पोलिस ठाण्यात बोलावून घेणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या संक्षरणासाठी कायदा करण्यात आला आहे. आई-वडिलांना घराबाहेर काढणार्‍या मुलांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी शिक्षा होऊ शकतो.