Fri, Aug 23, 2019 14:31



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कल्याणच्या तरुणीला राजस्थानात विकले

कल्याणच्या तरुणीला राजस्थानात विकले

Published On: Feb 10 2018 2:17AM | Last Updated: Feb 10 2018 1:18AM



कल्याण  :  वार्ताहर

मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणार्‍या महिलेस तिच्या मुलीला रोजगाराचे आमिष दाखवत कल्याणमधून राजस्थानला नेले. त्याठिकाणी या महिलेच्या नकळत तिच्या मुलीला तब्बल दीड लाखांना विकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, यानुसार पोलिसांनी माला शर्मा, तिचा पती विष्णू शर्मा, मनोहर शर्मा व रामेश्वर या चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 सदर पीडित महिला ही मुळची जालना येथील रहिवासी असून ती कल्याणमध्ये मोलमजुरीची कामे करत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती. गतवर्षी या पीडित महिलेच्या ओळखीतले माला शर्मा, विष्णू शर्मा, मनोहर शर्मा या तीन जणांनी तिला व तिच्या मुलीला रोजगार मिळवून देतो असे आमिष दाखवत राजस्थान येथील प्रतापगड बरोटा येथे नेले. या ठिकाणी मुलीला काम लागल्याचे सांगत महिलेला पुन्हा कल्याणला जाण्यास सांगितले. त्यामुळे ही महिला पुन्हा कल्याणला परतली. 

महिनाभराचा कालावधी उलटूनही मुलगी न परतल्याने तिने या तिघांकडे विचारणा केली. मात्र त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यानंतर तिने दोन-तीनदा राजस्थान गाठत या तिघांना मुलीला परत पाठवा, अशी विनवणी केली. याच दरम्यान या तिघांनी रामेश्वर नावाच्या व्यक्तीला आपल्या मुलीला तब्बल दीड लाखांना विकले असून, तिला डांबून ठेवल्याची माहिती मिळाल्याने या महिलेला धक्काच बसला. त्यानंतर वारंवार विनंती करूनही मुलगी परत न मिळाल्याने अखेर हताश झालेल्या महिलेने गुरुवारी उशिराने याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. तक्रारीनुसार पोलिसांनी माला शर्मा, पती विष्णू शर्मा, मनोहर शर्मा व रामेश्वर या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.