Sat, Aug 24, 2019 23:17होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दारूसाठी पैसे मागणार्‍या चुलत भावाची केली हत्‍या

दारूसाठी पैसे मागणार्‍या चुलत भावाची केली हत्‍या

Published On: Mar 14 2018 4:37PM | Last Updated: Mar 14 2018 4:37PMकल्याण : वार्ताहर 

दारूसाठी सतत पैसे मागणे आणि दारूचा नशेत शिवीगाळ करणे या त्रासाला कंटाळून चुलत भावानेच आपल्‍या भावाची हत्‍या केल्‍याची घटना घडली. ज्ञानेश्वर कोट असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेतील आरोपी चुलत भावासह त्‍याच्या साथीदाराला अटक करण्यात आली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की,कल्याण नजीक असलेल्या आंबिवली येथील मोहोने गावात राहणारा शेतकरी ज्ञानेश्वर कोट हा तरूण १३ फेब्रुवारी पासून बेपत्ता झाला होता. त्याबाबत त्याची पत्नी सुरेखाने खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून आपल्या पतीच्या जीवाला धोका असल्‍याची  भीती व्यक्त केली होती. त्यानुसार खडकपाडा पोलिसांनी तपास सुरू केला. याच दरम्यान, मयत ज्ञानेश्वर हा १३ फेब्रुवारी त्याचा चुलत भाऊ मोतीराम कोट आणि पडघा येथे राहणाऱ्या निखील जाधव यांच्यासोबत दिसल्याची पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शोध घेत ८ मार्च रोजी निखील याला ताब्यात घेतले. निखीलकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता, त्याने आणि मोतीरामने मिळून ज्ञानेश्वरची हत्या केल्याची कबुली दिली. त्यावरून पोलिसांनी मोतीराम याला अटक केली. त्या दोघांनी दिलेल्या माहितीनुसार,मोतीरामकडे ज्ञानेश्वर हा दारू पिण्यासाठी नेहेमी पैसे मागत असे आणि दारू प्यायल्यानंतर तो मोतीरामलाच शिवीगाळ करीत असे. या प्रकाराला वैतागलेल्या मोतीरामने हा राग मनात धरून निखिलच्या मदतीने ज्ञानेश्वरची हत्या केली. महाशिवरात्रीच्या दिवशी मोतीराम एनपीएल कंपनीजवळील कामाच्या ठिकाणी ज्ञानेश्वर याला नेले. तेथे त्यांनी ज्ञानेश्वरला भरपूर दारू पाजली. नंतर त्यांनी मद्यधुंद अवस्थेतील ज्ञानेश्वरच्या डोक्यात लोखंडी रॉडने प्रहार केला आणि गळा कापून त्याची हत्या केली. ज्ञानेश्वर मयत झाल्याची खात्री पटल्यानंतर त्यांनी एका गोणीत त्याचा मृतदेह भरून एनपीएल कंपनीच्या कम्पौंडच्या बोगद्यातून बाहेर काढून मागील दलदलीच्या जागेतील गवतात नेऊन टाकला. खडकपाडा पोलिसांनी मोठ्या कौशल्याने या हत्येमागील गूढ उकलण्यात यश मिळवले असून सध्या आरोपी पोलीस कोठडीत आहेत