होमपेज › Mumbai-Thane-Raigad › तिकिटाच्या बहाण्याने बॅगा पळवणार गजाआड

तिकिटाच्या बहाण्याने बॅगा पळवणार गजाआड

Published On: Feb 13 2018 2:14PM | Last Updated: Feb 13 2018 2:14PMकल्याण : वार्ताहर

कल्याण रेल्वे स्थानक परिसरात नाना शक्कल लढवत प्रवाशांना लुबाडण्याचे प्रकार सुरू असतात. या अशा प्रकारामुळे प्रवासीवर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.अशाच प्रकारे टिकिट काढून देण्याच्या बहाण्याने प्रवाशांना आडोशाला नेत बोलण्यात गुंतवून त्यांच्या जवळील बॅग लंपास करणाऱ्या टोळीचा महात्मा फुले पोलिसानी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पर्दाफाश केला असून या टोळीच्या म्होरक्याला अटक केली आहे .मोहम्मद मुमताज असे या चोरट्याचे नाव असून त्याचे दोन साथीदार फरार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

कल्याण रेल्वे स्थानक परिसरात तिकिटाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या प्रवाशांना ओळखून त्यांना आमची ओळख असल्याचे सांगत तिकीट काढून देण्याच्या बहाण्याने स्टेशन बाहेर आणून बोलण्यात गुंतवून ठेवण्यात येत असे. त्यानंतर त्यांच्याजवळील बॅग चोरून पळ काढण्याच्या घटना वाढीस लागल्या होत्या. या वाढत्या घटनांमुळे प्रवासी धास्तावले होते तर पोलीस यंत्रणा या चोरट्यांच्या मागावर होती. तीन जणांची टोळी हे काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी रेल्वे स्थानक व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले, त्या आधारे त्यांना या टोळीचा म्होरक्या मोहम्मद मुमताज याची ओळख पटली. पोलिसांनी मोहम्मद मुमताज याला अटक करत त्याच्या दोन फरार साथीदारांचा शोध सुरू केला आहे. हे तिघे तिकीटाची प्रतिक्षा करणाऱ्या प्रवाशांना गाठून त्यांना आपला नातेवाईक टीसी असल्याचे सांगण्यात येत होते. ते तिकीट काढून देतील असे सांगून बोलण्यात गुंतवून रेल्वे स्थानकाबाहेर बोलवून आणून त्यांची बॅग चोरून तेथून पळून जात होते. असे कृत्य करणार्‍या या टोळीचा म्होरक्या अखेर गजाआड झाला आहे.