Fri, Apr 26, 2019 15:19होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सैन्यदलात शौर्य गाजवणार्‍या जवानाची  उपासमार

सैन्यदलात शौर्य गाजवणार्‍या जवानाची  उपासमार

Published On: Feb 11 2018 2:35AM | Last Updated: Feb 11 2018 2:34AMडहाणू : चंद्रकांत खुताडे

भारतीय सैन्य दलात अजोड पराक्रम गाजवणारे लष्करी जवान  दत्ता सोमा थापड  (रा. वसा, पाटीलपाडा) यांना सेवानिवृत्तीनंतर तब्बल 18 वर्षांनंतरही भविष्य निर्वाह निधी, पेन्शन व अन्य सेवानिवृत्त सोयीसुविधा न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

दत्ता थापड या आदिवासी जवानाची 21 नोव्हेंबर 1985 रोजी भारतीय सैन्यात भरती झाली. सैनिक पूर्वप्रशिक्षणात उत्तम प्रशिक्षण घेऊन त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला त्यानंतर त्यांची नियुक्ती महार रेजिमेंटमध्ये करण्यात आली व 8 - महार बटालियनमध्ये ते रुजू झाले. या बटालियन अंतर्गत ते सर्वप्रथम सिकंदराबाद येथे सेवा बजावू लागले. 1987 ते 1989 या दोन वर्षांच्या कालावधीसाठी त्यांची श्रीलंकेत पाठवण्यात आलेल्या शांती सेनेत निवड झाली. लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम (लिट्टे) या दहशतवादी संघटनेच्या दहशतवादाविरोधात त्यांनी प्रत्यक्ष युद्धभूमीवर युद्ध केले. तेथेही त्यांनी आपल्या पराक्रमाची चुणूक दाखवली. या बटालियनला शासनाकडून सर्वोच्च परमवीर चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर ते मायदेशात परतले व मेरठ येथील छावणीत सेवा बजावू लागले.

त्यानंतर अरुणाचल प्रदेशमधील तेजू व पंजाबमधील फिरोजपूर येथे ही राष्ट्रसेवा कर्तव्य बजावले. त्यानंतर पुन्हा अरुणाचल प्रदेशमध्ये कि.मी. -6 पॉइंट या ठिकाणी त्यांची  पोस्टिंग करण्यात आली. भारत-चीन सीमेवरील हे महत्त्वाचे व अत्यंत खडतर ठिकाण असल्याने येथे पोहोचण्यासाठी दोन दिवस सैनिकांना चालतच जावे लागते. येथेही त्यांनी उत्तम सेवा बजावली. त्यानंतर जयपूरमध्ये त्यांनी आपल्या सेवेचा अंतिम कार्यकाळ पूर्ण केला. यादरम्यान त्यांच्या घरावर काही समाजकंटकांनी हल्ला करून घर पेटवले. आपल्या कुटुंबाच्या जीविताची काळजी त्यांना वाटू लागली म्हणून लष्करी अधिकार्‍यांना विचारून त्यांच्या परवानगीने ते काही दिवस आपल्या घरी परत आले. मात्र,  कर्तव्यावर असलेल्या तत्कालीन लष्करी अधिकार्‍यांनी या जवानावर अन्याय करताना त्यांचे पेन्शन डॉक्युमेंट्स अलाहाबाद येथे सेवापूर्तीसाठी पाठवलेच नाहीत. 

सन 2000  मध्ये थापड हे नियमानुसार सेवानिवृत्त झाल्याने त्यांना शासनाकडून भविष्य निर्वाह निधी पेन्शन व इतर सुविधा देणे क्रमप्राप्त होते. परंतु, तत्कालीन लष्करी अधिकार्‍यांच्या बेपर्वाईमुळे त्यांना कोणत्याही सुविधेचा लाभ मिळाला नाही. आपल्याला सेवानिवृत्ती नंतर शासकीय योजनांचा लाभ मिळावा म्हणून 18 वर्षांपासून थापड संघर्ष करत आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने 19 मार्च 2003 मध्ये संबंधित जवानाला लाभ देण्याचा आदेश दिला. तरीही लष्करी अधिकार्‍यांच्या मनमानी कारभारामुळे या पराक्रमी जवानाला न्याय मिळालेला नाही. त्यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून आपली व्यथा मांडली.  पंतप्रधान कार्यालयाने ताबडतोब आदेश देऊन थापड यांना संबंधित सर्व सुविधा मिळवून देण्याचे आदेश दिले. मात्र, अद्याप लष्करी अधिकार्‍यांनी थापड यांना न्याय दिला नाही.