Fri, Apr 26, 2019 04:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कल्‍याणमध्ये राहणारा इसीसीचा एजंट काबुलमध्ये ठार

कल्‍याणमध्ये राहणारा इसीसीचा एजंट ठार

Published On: Mar 09 2018 3:52PM | Last Updated: Mar 09 2018 3:52PMडोंबिवली : वार्ताहर

अफगाणिस्तानचा नागरिक आणि महाराष्ट्र एटीएसचा मोस्ट वॉन्टेड रेहमान दौलती याचा गोळीबारात मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्र एटीएसने त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरु केला होता. मात्र ३० मे २०१७ रोजी रेहमानला काबूल येथील त्याच्या राहत्या घराबाहेर झालेल्या चकमकीत तो ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. रेहमानच्या पत्नीच्या नातेवाईकानी ही माहिती उघड केली आहे.

यास्मिन असे रेहमानच्या पत्नीचे नाव आहे. यास्मिन आणि रेहमानचा २०११ सालात निकाह झाला आहे. काही दिवस हे दोघे नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे भाड्याच्या घरात रहात होते. दोन महिने तिथे राहिल्यावर हे दोघेही अफगाणिस्तानमध्ये जाऊन राहू लागले असल्याची माहितीही यास्मिनच्या नातेवाईकाने दिली. ज्या महिन्यात रमझान सुरू होता त्याच महिन्यात रेहमानला चकमकीत ठार करण्यात आले. रेहमानच्या मृत्यूची कल्पना त्याचा भाऊ रोशन याला आम्ही दोन महिन्यानंतर दिली असेही यास्मिनच्या नातेवाईकाने सांगितले. रेहमानची पत्नी यास्मिनला तिच्या आई-वडिलांनी भारतात परतण्यासाठी सक्ती केल्यामुळे ती भारतात परतली आहे. मागच्याच महिन्यात आपल्या चार मुलांसह ती परतली. मात्र तिने अफगाणिस्तानात परत यावे, असा दबाव तिच्या सासरच्या मंडळींकडून टाकला जात असल्याचे तिच्या नातेवाईकाने म्हटले आहे. कल्याणमध्ये राहणारे अमन तांडेल, सहिम तानकी, आरिफ मजिद आणि फहाद शेख हे चौघेजण इसीसमध्ये दाखल होण्यासाठी २०१४ मध्ये गेले होते. बगदादमार्गे ते आयसिसमध्ये दाखल झाले. त्यावेळी त्यांना रेहमानने मदत केली होती. तेव्हापासूनच महाराष्ट्र एटीएसच्या रडारवर रेहमान होता.

रेहमान दौलतीचे कल्याणमध्ये वास्तव्य 

सप्टेंबर २०१४ मध्ये महाराष्ट्र एटीएसने चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. ज्यामध्ये दोन अफगाणिस्तानच्या रेहमान दौलती आणि मोहम्मद रतेब या दोघांचा समावेश होता. या दोघांसोबतच कल्याणच्या आदिल डोलारेवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपलब्ध माहितीनुसार रेहमान नोव्हेंबर २०१३ मध्ये कल्याणमध्ये आला होता. कल्याणच्या एका बड्या हॉटेलमध्ये त्याचे काही दिवस वास्तव्य होते. आदिल डोलारे या कल्याणच्या हॉटेल मालकाने रेहमान हा आपला मित्र असल्याची माहिती दिली होती. रेहमान हा आपल्या व्यवसायातील भागीदार असून तो अफगाणिस्तानहून भेटण्यासाठी आला होता असे आदिल डोलारेने सांगितले. २०१४ मध्ये रेहमान पुन्हा एकदा भारतात आला. त्यावेळी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. एटीएसकडून काही वेळ चौकशी करून त्यानंतर त्याला सोडण्यात आले. रेहमानने चार तरूणांना इसीसमध्ये भरती होण्यासाठी मदत केल्याच त्यावेळी समोर आले होते. मात्र हाच रेहमान चकमकीत ठार झाल्याची माहिती बाहेर आली आहे.