होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कार्ती चिदम्बरम-इंद्राणी मुखर्जी ‘आमनेसामने’

कार्ती चिदम्बरम-इंद्राणी मुखर्जी ‘आमनेसामने’

Published On: Mar 04 2018 8:18PM | Last Updated: Mar 04 2018 8:15PMमुंबई : वृत्तसंस्था

आयएनएक्स मीडिया घोटाळाप्रकरणी माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांचा मुलगा कार्ती आणि आयएनएक्स कंपनीची संचालिका इंद्राणी मुखर्जी यांना एकमेकांसमोर बसवून सीबीआयने चौकशी केली. शिना बोरा हत्याप्रकरणी इंद्राणी मुखर्जी सध्या भायखळा येथे तुरुंगात असून त्यासाठी रविवारी सकाळी कार्तीला आणण्यात आले होते. या दोघांची चौकशी कॅमेर्‍यात रेकॉर्ड करण्यात आली.

या चौकशीदरम्यान इंद्राणीने कार्तीची भेट घेतल्याची कबुली दिली. आपण आणि आपले पती पीटर तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांच्या सांगण्यानुसार कार्तीला भेटलो. अर्थात, कार्तीने या आरोपांचा इन्कार केला आहे. या दोघांच्या एकत्रित चौकशीची मागणी गेल्या आठवड्यात सीबीआयने आपल्या विशेष न्यायलयाकडे केली होती. सध्या कार्ती पाच दिवसांच्या सीबीआय कोठडीत आहे.
या दोघांची चौकशी सुरू असताना अत्यंत कडक बंदोबस्त तुरुंगात ठेवण्यात आला होता. कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीला आत येण्याची परवानगी नव्हती.

2007 साली चिदम्बरम अर्थमंत्री असताना आयएनएक्स मीडियाला 305 कोटींचा विदेशी निधी मंजूर केल्याचे हे प्रकरण आहे. आयएनएक्स मीडियाने विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाकडून परवानगी घेताना अनेक घोटाळे केले होते, असा आरोप असून हा निधी मिळवून देण्यासाठी कार्तीच्या कंपनीने 10 लाख रुपये घेतल्याचाही आरोप आहे.

मीडियाकडे पाहून कार्तीचे हातवारे 
दुपारी तीन वाजण्याच्या सुमार सीबीआयची टीम कार्तीला घेऊन बाहेर आली. हसतमुखाने बाहेर आलेला कार्ती कारच्या फूटबोर्डवर उभा राहिला आणि राजकीय नेते जसे हातवारे करतात, तशाच जोशात मीडियाकडे पाहून हात हलवले. यानंतर सीबीआय अधिकार्‍यांनी त्याला कारमध्ये बसण्याची सूचना केली.