Tue, Jul 23, 2019 06:14होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'पर्ल्स' गुंतवणूकदारांचा 'सेबी' विरोधात देशव्यापी महामोर्चा

'पर्ल्स' गुंतवणूकदारांचा 'सेबी' विरोधात महामोर्चा

Published On: Feb 26 2018 6:01PM | Last Updated: Feb 26 2018 7:21PMमुंबईः प्रतिनिधी

देशभरातील कोट्यावधी ठेवीदारांचे पैसे बुडविणाऱ्या 'पर्ल्स' (पीएसीएल) कंपनीविरोधात गेली अनेक वर्षे लढा देणा-या जनलोक प्रतिष्ठान संघटनेच्यावतीने सेबी (सेक्युरिटीज् अ‍ॅन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया) विरोधात महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. आज एक लाखांहून अधिक गुंतवणूकदार देशभरातून आल्याची माहिती, जनलोक प्रतिष्ठान संघटनेच्यावतीने अध्यक्षा सुनंदा कदम यांनी दिली.

पीएसीएल कंपनीच्या ऑस्ट्रेलिया येथील हॉटेल शेरेटॉन मिराज या मालमत्तेच्या विक्रीतून जवळपास 79 मिलीयन डॉलर्स (400 कोटी रुपये) तेथील कोर्टाच्या एस्क्रो अकौंटमध्ये जनलोक गुंतवणूकदार यांच्या दाव्यानुसार रोख रक्कम जमा आहे. परंतू, सेबीच्या हलगर्जीपणामुळे तेथील पैसा भारतामध्ये आणण्यास दिरंगाई होत आहे. 

तसेच सेबीने पीएसीएल कंपनीच्या 6 कोटी गुंतवणूकदारांची व्याजासह रकमेच्या परताव्याची जबाबदारी स्वीकारली नाही. त्यामुळे या गुंतवणूकदारांचा उद्रेक होऊन सेबीच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयावर संपूर्ण भारतातून सेबीच्या मनमानी कारभारामुळे “PACL प्रकरणातून सेबी हटाव” आंदोलन करण्यात आले.

केवळ राज्यातीलच नव्हे तर देशातील गोरगरीब जनतेने पी.ए.सी.एल कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे गुंतविले होते. परंतू, चार वर्षापुर्वी या कंपनीवर सी.बी.आय आणि सेबीची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले होते. 

या प्रकरणावर 90 दिवसांमध्ये पी.ए.सी.एल कंपनीच्या मालमत्तांची विक्री करुन गुंतवणूकदारांचे पैसे परत करावे असा आदेश मुंबई येथील सॅट कोर्टाने दिला होता. याविरोधात कंपनीने सर्वोच्च न्यायालयात अपिल केले होते. 

त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती आर.एम.लोढा यांची कमिटी स्थापन करुन पीएसीएल कंपनीच्या मालमत्तेची विक्री करुन 6 महिन्यांच्या आत गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचे आदेश दिले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला आज दोन वर्ष पूर्ण होत आहेत. तरी देखील कमिटीकडे केवळ 370 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. गुंतवणूकदारांच्या हक्काचे पैसे परत देण्यासाठी सेबी तांत्रिक पद्धतीने टाळाटाळ करत आहे.

पीएसीएल गुंतवणूकदारांच्या ठेवीतील 57 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्यामुळे हे प्रकरण देशभर गाजले. देशभरातील अंदाजे 5.85 कोटी गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे. शेकडो गुंतवणूकदारांनी आत्महत्या केल्या तर हजारो तरुणांचे रोजगार याप्रकरणी गेले आहेत.