Thu, Apr 25, 2019 11:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नगरसेवकांच्या रद्द झालेल्या काश्मीर दौर्‍याची चौकशी होणार!

नगरसेवकांच्या रद्द झालेल्या काश्मीर दौर्‍याची चौकशी होणार!

Published On: Jul 24 2018 1:08AM | Last Updated: Jul 24 2018 12:30AMमुंबई : प्रतिनिधी 

मुंबई महापालिकेच्या बाजार-उद्यान समितीमधील नगरसेवकांसाठी आयोजित केलेला काश्मीर दौरा ऐनवेळी रद्द झाला. त्यामुळे पालिकेचे 7 लाख 62 हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. याची चौकशी करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. 

बाजार उद्यान समितीमधील सर्व पक्षीय नगरसेवकांसाठी फेब्रुवारी 2016 मध्ये जम्मू-काश्मीर दौर्‍याचे आयोजन करण्यात आले होते. या दौर्‍याला जानेवारी 2016 मध्ये गटनेत्यांच्या बैठकीय मंजुरी देण्यात आली. या दौर्‍यांचे आयोजन महापालिका चिटणीस विभाग व राजशिष्टाचार विभाग असे संयुक्तरित्या केले जाते. त्यानुसार या दौर्‍याला सुमारे 13 लाख रुपये इतका खर्च येईल, असा प्रस्ताव राजशिष्टाचार विभागाने प्रशासनाला सादर केला. यात 17 नगरसेवकांसह अधिकारी यांचा विमानप्रवास, निवासस्थान, नाश्ता व जेवण याकरिता पालिका आयुक्तांच्या स्वेच्छाधीन रकमेतून याची तरतूद करण्यात आली. त्यानुसार आगाऊ रक्कमही देण्यात आली होती. ही रक्कम 30 जानेवारी 2016 रोजी बाजार उद्यान समिती अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक प्रद्युम्न केणी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. तर दौर्‍यादरम्यान हॉटेल व्यवस्था, अंतर्गत प्रवास, मुंबई-जम्मू व श्रीनगर-मुंबई विमानप्रवास आदींकरिता राजशिष्टाचारमार्फत बालमेर व लौरी ट्रॅव्हल्स अ‍ॅण्ड व्हेकेशन्स या कंपनीस 1 फेब्रुवारी 2016 रोजी 7 लाख 62 हजार 367 रुपये आगाऊ रक्कम देण्यात आली. 

हा दौरा ऐनवेळी रद्द करण्यात आल्याचे राजशिष्टाचार विभागाकडून कंपनीला दौरा रद्द झाल्याचे तातडीने कळवणे आवश्यक होते; परंतु राजशिष्टाचार विभागाने ट्रॅव्हल्स कंपनीशी तत्काळ संपर्क साधला नाही. जेव्हा संपर्क साधला तेव्हा कंपनीने आगाऊ रक्कम परत देण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे प्रमुख अधिकारी (चौकशी) यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीच्या अहवालात बुकिंग प्रक्रिया चिटणीस कार्यालयाद्वारे करण्यात आल्याचे म्हटले आहे. त्यामुळे चिटणीस विभागाच्या संबधितांविरोधात जबाबदारी निश्‍चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता नव्याने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.