Wed, May 27, 2020 01:46होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोरोनाग्रस्त वाढतच चालल्याने रेल्वेकडून पुन्हा मोठा निर्णय!

कोरोनाग्रस्त वाढतच चालल्याने रेल्वेकडून पुन्हा मोठा निर्णय!

Last Updated: Apr 08 2020 8:48AM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाकडून १५ एप्रिलपासून सुरू करण्यात आलेले ऑनलाईन बुकिंग पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने रेल्वे मंत्रालयाकडून हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता किमान ३० तारखेपर्यत तरी गाड्या धावणार नाहीत. दरम्यान, या काळात ज्या प्रवाशांनी बुकिंग केले आहेत. त्यांचे पैसे परत दिले जाणार आहेत, असे रेल्वेच्या अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले.

अधिक वाचा : कोरोनाची राजधानी वुहानसाठी तब्बल ७६ दिवसांनी लॉकडाऊनवरून मोठी बातमी!

कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी केंद्र सरकारने लागू केलेला देशव्यापी लॉकडाऊन येत्या १४ तारखेला संपत आहे. मात्र, लॉकडाऊन वाढविण्याचा सल्ला अनेक राज्यांनी दिल्याच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या कालावधीत वाढ केली जाऊ शकते का, यावर सरकार गंभीरपणे विचार करीत आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे लॉकडाऊनचा कालावधी वाढविला जावा, असा सल्ला अनेक राज्य सरकारांनी केंद्र सरकारला दिला आहे.

रुग्णांची संख्या वाढत असल्याने लॉकडाऊन उठविण्याची घाई केली जाऊ नये, असा इशारा आरोग्य क्षेत्रातील काही मान्यवरांनीही दिलेला आहे. त्यामुळे लॉकडाऊन वाढविला जाऊ शकतो का, यावर केंद्र सरकार गांभीर्याने विचार करीत असल्याचे समजते.

कोरोनाचे संक्रमण पसरू नये, या उद्देशाने मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात लॉकडाऊन लागू करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. लॉकडाऊनच्या २१ दिवसांचा कालावधी येत्या १४ तारखेला संपत आहे. विशेष म्हणजे लॉकडाऊन असूनही कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसात अतिशय झपाट्याने वाढलेली आहे. मागील तीन दिवसांत कोरोनाचे एक हजार नवे रुग्ण समोर आले असून देशभरातील रुग्णांची संख्या ४५०० च्या आसपास पोहोचली आहे. तर मृतांची संख्या ११४ वर गेली आहे. 

महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली आदी ठिकाणी कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ झाली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी लॉकडाऊनचा कालावधी आणखी दोन आठवड्यासाठी वाढविण्याची मागणी केंद्र सरकारकडे केलेली आहे. २ जूनपर्यंत लॉकडाऊन वाढविणे गरजेचे असल्याच्या एका अहवालाचा आधार यासाठी राव यांनी दिला होता. तर लॉकडाऊन लगेच न हटविता तो टप्प्या-टप्प्याने हटविला जावा, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी सांगितले होते.