Tue, Jul 23, 2019 02:06



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › देशाची आर्थिक राजधानी होतेय स्मार्ट आणि सेफ सिटी!

आर्थिक राजधानी होतेय स्मार्ट आणि सेफ सिटी!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा





मुंबई : प्रतिनिधी

देशाच्या आर्थिक राजधानीचे शहर असलेल्या मुंबईवर 26/11 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण शहरात सीसीटीव्ही कॅमेरे, मुंबई पोलीस मुख्यालयात अत्याधुनिक नियंत्रण कक्ष बनविण्याची आखण्यात आलेली योजना अखेर पूर्णत्वास आली आहे. संपूर्ण शहरात सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे जाळे निर्माण करण्यात येत आहे. त्यासोबतच एनएसजी कमांडोंच्या धर्तीवर अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि प्रशिक्षण देऊन सज्ज करण्यात आलेले शिघ्रकृती दल, फोर्स वन आणि बुलेट मास्क मॅन पथके ही मुंबई पोलीस दलाची जमेची बाजू ठरली आहेत.

केवळ पोलीस बळाच्या जोरावर मुंबईचे संरक्षण करता येणार नाही. मनुष्यबळ वाढविण्यात मर्यादा आहेत. त्यावर आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे हा एकच पर्याय असल्याचे
निरीक्षण मुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर नेमण्यात आलेल्या राम प्रधान समितीने नोंदवत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची शिफारस केली होती. शहरातील
छोट्या-मोठ्या हालचाली टिपण्यासोबत गुन्हेगारी कारवाया आणि गुन्ह्यांची उकल करण्यास मदत होईल. तसेच पोलीस दलात पारदर्शकता येईल, याच विचारातून शहरात सहा हजार सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे जाळे निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गेली सात वर्षे सरकारी फायलींमध्ये बंद असलेल्या या प्रकल्पास नव्या सरकारने गती दिल्यानंतर दक्षिण मुंबईतील कुलाबा ते वरळीदरम्यान 1250 सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्याचा पहिला टप्पा हाती घेऊन, तो पूर्णत्वास आला. त्यापाठोपाठ उर्वरित संपूर्ण शहरात म्हणजेच मध्य मुंबईसह पूर्व आणि पश्‍चिम उपनगरांत 3443 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे.

अत्याधुनिक आणि अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या जाळ्यातील 500 कॅमेरे फिरते असून केव्हाही कोणत्याही दिशेला नियंत्रण कक्षातून वळविता येणार आहेत. त्यासाठी लागणारा अद्ययावत सीसीटीव्ही कंट्रोलरूम मुंबई पोलिसांच्या मुख्यालयातील नव्याने बांधण्यात आलेल्या सहाव्या मजल्यावर बनविण्यात आला आहे. तसेच याच प्रकल्पाचा भाग म्हणून इमर्जन्सी रिस्पान्स, मोबाईल सर्वे लियन्स आणि कमांड सेंटर नावाची अद्ययावत अशी स्वत:च एक छोटा कंट्रोलरूम असणारी व्हॅन मुंबई पोलिसांच्या ताफ्यात सामील करण्यात आली आहे. मुंबईतील हे सर्व कॅमेरे पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर शहरात प्रवेश करणार्‍या, प्रत्येक वाहन, व्यक्तीसह शहरातील रस्त्यांवरील संशयास्पद हालचाली, वाहनांचे नंबर डिटेक्शन, व्हिडीओ अ‍ॅनालिटिकल करण्यास, तसेच शहरातील महत्त्वाच्या आणि अतिसंवेदनशील ठिकाणांची सुरक्षाव्यवस्था अधिक चोख ठेवण्यात मदत होणार आहे.

मुंबई पोलिसांच्या मुख्यालयातील मुख्य नियंत्रण कक्षासह पाच प्रादेशिक विभागीय कार्लयात स्वतंत्र नियंत्रण कक्षांच्या माध्यमातून संपूर्ण शहरावर नजर ठेवली जाणार आहे. एकूणच, सीसीटीव्हीचा हा प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित झाला, की जगाच्या नकाशावर मुंबई स्मार्ट सिटी सोबतच सेफ सिटी म्हणून आळखली जाणार आहे, हे नक्की.

शहरातील सर्व पोलीस ठाण्यामध्ये आरोपींची माहिती संकलित करण्यासाठी एबीएमआयएस मशीन्स बसविण्यात आल्या आहेत. या मशिनमध्ये आरोपींच्या डोळे, बोटांचे ठसे मुद्रित करण्यात येत असून त्यांच्या गुन्हेगारीचा आलेख नोंदविण्यात येत आहे. एखाद्या आरोपीच्या डोळ्यांची छबी किंवा बोटांचे ठसे सापडले तरी एका क्लिकवर त्याची संपूर्ण
कुंडली समोर येणार आहे.