Wed, Feb 20, 2019 02:33होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लाखांचे पोशिंदे जगलेच पाहिजेत ; शिवसेनेचा भाजपला टोला

लाखांचे पोशिंदे जगलेच पाहिजेत ; शिवसेनेचा भाजपला टोला

Published On: Jun 11 2018 10:08AM | Last Updated: Jun 11 2018 10:08AMमुंबई : पुढारी ऑनलाईन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नक्षलवाद्यांकडून आलेल्या धमकीवरून शिवसेनेने भाजपवर टीका केली आहे. 'पंतप्रधानांची सुरक्षा आहे त्यापेक्षा जास्त मजबूत करता येईल काय? व मुख्यमंत्री फडणवीस यांना ‘मोसाद’च्या धर्तीची सुरक्षा व्यवस्था पुरवता येईल काय? यावर गांभीर्याने विचार करावाच लागेल. कारण पुन्हा तेच. लाख मेले तरी चालतील (तसे ते मरतच आहेत), पण लाखांचे पोशिंदे जगलेच पाहिजेत,' असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून भाजपला लावला आहे. 

नक्षलींचा नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांना मारण्याचा कट होता, लाखाचे पोशिंदे जगलेच पाहिजेत, त्‍यामुळे त्यांना उदंड, निरोगी, दीर्घायुष्य लाभो अशी सदिच्छाही सामनातून व्यक्त करण्यात आली आहे. त्याचबरोबर नक्षलवाद्यांकडून मिळालेल्या धमकीबाबतच्या कथानकात काही कच्चे दुवे राहिल्यानेच विरोधक टीका करत असल्याचेही ‘सामना’त म्हटले आहे.

पुणे पोलिसांनी भीमा–कोरेगावच्या दंगलीमागच्या सूत्रधारांना आता अटक केली व हे सर्व लोक विध्वंसक विचारांचे नक्षलवादी आहेत. हेच लोक मोदी–फडणवीसांना मारण्याचा कट रचत होते. हे सगळे रोमांचक तितकेच थरारक आहे. अर्थात या कथानकात काही कच्चे दुवे आहेत. त्यामुळे विरोधकांना टीकेस वाव मिळाला आहे. पंतप्रधानांची सुरक्षा आहे त्यापेक्षा जास्त मजबूत करता येईल काय व मुख्यमंत्री फडणवीसांना ‘मोसाद’च्या धर्तीची सुरक्षा व्यवस्था पुरवता येईल काय यावर गांभीर्याने विचार करावाच लागेल. कारण पुन्हा तेच. लाख मेले तरी चालतील (तसे ते मरतच आहेत), पण लाखांचे पोशिंदे जगलेच पाहिजेत. आम्ही मोदी व फडणवीस यांना उदंड निरोगी दीर्घायुष्य चिंतीत आहोत असेही सामनातून म्हटले आहे.