Tue, Apr 23, 2019 21:34होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डोंबिवलीकर ‘एसकेपी’ तरुण होतोय जैन मुनी

डोंबिवलीकर ‘एसकेपी’ तरुण होतोय जैन मुनी

Published On: Apr 23 2018 1:58AM | Last Updated: Apr 23 2018 1:43AMडोंबिवली : वार्ताहर

डोंबिवलीत राहणार्‍या एका मराठी तरुणाने जैन धर्म स्वीकारल्याची घटना घडली आहे. मंदार म्हात्रे असे या तरुणाचे नाव असून तो येत्या 27 एप्रिलला जैन मुनी म्हणून दीक्षा घेणार आहे. महाराष्ट्रात जैन किंवा गुजराती समाजाशिवाय अन्य धर्मातील तरुणाने जैन धर्म स्वीकारण्याची ही दुर्मीळ घटना असल्याने डोंबिवलीकारांचे या घटनेकडे लक्ष केंद्रित झाले आहे. 

डोंबिवलीच्या पूर्वेकडील आयरे रोडला असलेल्या तुकारामनगर मराठीबहुल लोकवस्ती असलेल्या ठिकाणी आपल्या आई-वडिलांसोबत राहणार्‍या मंदारचे दहावीपर्यंतच शिक्षण हे डोंबिवलीतील पाटकर विद्यालयात झाले आहे. शालांत परीक्षेत त्याला 75 टक्के इतके गुण मिळाले आहेत. तो राहत असलेल्या इमारतीतील शेजारी राहणार्‍या मधुबेन यांच्यासोबत मंदार हा जैन साधूंच्या संपर्कात आला. सोमवंशी क्षत्रिय पाठारे (एसकेपी) समाजात जन्माला आलेल्या मंदारची 2014 साली गुरू पुज्य अभ्यशेखर सुरी महाराज यांच्याशी जैन मंदिरात ओळख झाली. या भेटीनंतर मंदारचे आयुष्यच बदलून गेले. 3 वर्षांपूर्वी त्याने 3 हजार किमी प्रवासाची यात्रा केली. जुलै ते ऑक्टोबर महिन्यात डोंबिवलीत जैन मंदिरात प्रवचने व्हायची. ही प्रवचने ऐकल्यानंतर मला घरी जायची इच्छाच होत नसायची, असे मंदारने सांगितले. 

जैन धर्माची गोडी निर्माण झाल्यानंतर मंदारने नुकताच 44 दिवसांचा कडक उपवास पूर्ण केला. 9.30 ते 6.45 या काळात केवळ गरम पाणी पिऊन त्याने उपवास पूर्ण केला. उपवासाचा पहिला दिवस तर त्याने काहीही खाल्ले नाही. येत्या 27 एप्रिल रोजी स. वा. जोशी हायस्कूलच्या प्रांगणात मंदारचा दीक्षांत विधी सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला जैन साधू-मुनी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

Tags : Mumbai, Dombivli, Marathi youth, acceptance, Jain religion, Mumbai news,